कलाकाराकडून हाफिज सईदचं कौतुक; नेटफ्लिक्सच्या पाकिस्तानी सीरिजवरून भारतात संताप!
फवाद खान आणि माहिरा खान यांची प्रमुख भूमिका असलेली नेटफ्लिक्सची पहिली पाकिस्तानी वेब सीरिज 'जो बचे हैं संग समेट लो' प्रदर्शनापूर्वीच वादात सापडली आहे. देशभरातील विरोध, कलाकाराच्या जुन्या वादग्रस्त ट्विटमुळे वाढलेला रोष आणि सिनेसृष्टीतील संघटनांच्या तक्रार
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
केंद्र सरकारने नेटफ्लिक्सला काय निर्देश दिले?
'जो बचे हैं संग समेट लो' मध्ये काय आहे?
Jo Bachay Hain Sang Samait Lo, नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान कुठल्या ना कुठल्या कारणाने एकमेकांशी भिडलेले असणं हे काही आपल्यासाठी नवीन नाही. कधी हा वाद एखाद्या पाकिस्तानी नेत्याच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे निर्माण होतो, तर कधी पाकिस्तानशी क्रिकेटचे सामने व्हावेत की नाही यावरून. सध्या देखील सोशल मीडियावर एक नवीन वाद समोर आल्याचं बघायला मिळतंय. वादाच्या केंद्रभागी आहे पाकिस्तानची पहिली नेटफ्लिक्स सीरिज 'जो बचे हैं संग समेट लो'.
प्रसिद्ध पाकिस्तानी कलाकार फवाद खान (Fawad Khan) आणि माहिरा खान (Mahira Khan) यांची प्रमुख भूमिका असलेली नेटफ्लिक्सची पहिली उर्दू-भाषिक ओरिजिनल वेब सीरिज 'जो बचे हैं संग समेट लो' येत्या 4 डिसेंबर 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. मात्र, ही सीरिज भारतीय प्रेक्षकांना पाहायला मिळणार का, यावर आता मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. देशभरातून वाढणारा विरोध आणि सिनेसृष्टीतील संघटनांच्या तक्रारींची दखल घेत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सला स्पष्ट शब्दांत इशारा दिलाय की, पाकिस्तानमधून येणारा कोणताही कंटेंट भारतात स्ट्रीम होऊ नये, याची खात्री करा.
केंद्र सरकारने नेटफ्लिक्सला काय निर्देश दिले?
माहिती व प्रसारण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जो बचे हैं संग समेट लो' (Jo Bachay Hain Sang Samait Lo) या सीरिजच्या भारतातील संभाव्य प्रदर्शनाविरोधात मंत्रालयाला अनेक तक्रारी आणि निवेदने प्राप्त झाली होती. त्यानंतर मंत्रालयाने नेटफ्लिक्सला 8 मे 2025 रोजी जारी केलेल्या सरकारी मार्गदर्शक तत्त्वांची आठवण करून दिली आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असताना केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत 8 मे 2025 रोजी सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म आणि डिजिटल मध्यस्थांना पाकिस्तानी कंटेंट बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर जून 2025 मध्ये नेटफ्लिक्सने स्वतः मंत्रालयाला कळवलं होतं की, त्यांनी पाकिस्तानमध्ये तयार झालेला कोणताही चित्रपट किंवा वेब सीरिज भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेली नाही. आता मंत्रालयाने नेटफ्लिक्सला आपल्या जून 2025 च्या त्याच आश्वासनावर ठाम राहण्यास सांगितलं आहे. या संपूर्ण वादावर नेटफ्लिक्सने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
हे ही वाचा>> प्रणव मुखर्जी यांच्या सल्ल्याने सुवेंदू बनले 'अधिकारी'?
सोशल मीडियावरील या वादात उडी घेत शिवसेनेने देखील सीरिजच्या भारतातील प्रदर्शनास विरोध केलाय. शिवसेना नेते आनंद दुबे (Anand Dubey) वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना म्हणाले, "पाकिस्तानने त्यांना हवं ते करावं. त्यांनी वेब सीरिज बनवावी, क्रिकेट खेळावं किंवा दहशतवादाला पोसावं. पण ते त्यांनी त्यांच्या देशात करावं. आम्हाला पाकिस्तानशी कुठलेही सांस्कृतिक संबंध नकोत. चित्रपट असोसिएशनकडून पंतप्रधानांना पत्र लिहिण्यात आलंय की ही सीरिज किमान भारतात दाखवली जाऊ नये. पाकिस्तानचा पूर्णपणे बहिष्कार हा सध्या भारताच्या प्राधान्यक्रमाचा विषय आहे."
कलाकाराकडून हाफिज सईदचं कौतुक
दरम्यान, या सीरिजमधील एक प्रमुख कलाकार हमझा अली अब्बासी (Hamza Ali Abbasi) यांचा 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद (Hafiz Saeed) याच्यासोबतचा एक फोटो आणि अब्बासी यांनी सईदवर केलेल्या कौतुकाच्या वर्षावामुळे देखील हा वाद अजूनच चिघळला आहे. केवळ भारतीयच नव्हे, तर पाकिस्तानी नेटकऱ्यांकडून देखील या फोटोमुळे अब्बासी यांना झोडपून काढण्यात येतंय.

हाफिज सईदसोबतचा फोटो ट्विट करताना अब्बासी यांनी लिहिलंय, "मी ज्या सर्वात चांगल्या आणि विनम्र लोकांशी भेटलोय त्यांच्यापैकी एक. ते धार्मिक सहिष्णुता आणि मानवतेचा प्रचार करतात. दुर्दैवाने, पाकिस्तानात त्यांच्याविषयी बरेच गैरसमज आहेत. त्यांच्याविषयीचा अपप्रचार समजून घेण्यासाठी त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली." एवढं एकच ट्विट नाही, तर त्यानंतर देखील अब्बासी यांनी अनेकवेळा हाफिज सईदचा बचाव केलाय.
हे ही वाचा>> ओवैसी, आजम खान का भिडलेत? युपीतला मुस्लीम कुणाच्या बाजूने?
'जो बचे हैं संग समेट लो' मध्ये काय आहे?
'जो बचे हैं संग समेट लो' ही सीरिज फरहत इश्तियाक (Farhat Ishtiaq) यांच्या याच नावाच्या गाजलेल्या उर्दू कादंबरीवर आधारित असून मोमिना दुरैद (Momina Duraid) यांनी तिचं दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. ही कादंबरी 2013 मध्ये प्रकाशित झाली होती आणि तिचं नाव प्रसिद्ध शायर फैज अहमद फैज (Faiz Ahmed Faiz) यांच्या एका गझलेवरून घेण्यात आलंय. 3 पिढ्यांमधील 6 प्रेमकथांचा संगम असलेल्या या मालिकेत फवाद खान आणि माहिरा खान यांच्यासोबत हानिया आमिर (Hania Aamir), सनम सईद (Sanam Saeed), अहद रझा मीर (Ahad Raza Mir), हमझा अली अब्बासी आणि इकरा अजीज (Iqra Aziz) यांसारखे लोकप्रिय पाकिस्तानी कलाकार आहेत.
एकीकडे जगभरात या सीरिजची प्रतीक्षा असताना, भारतात मात्र राष्ट्रीय सुरक्षा, सरकारी मार्गदर्शक तत्त्वे आणि जनभावनेच्या कसोटीवर पाकिस्तानी मनोरंजनाला थारा नसल्याचं या ताज्या घडामोडींनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. आता नेटफ्लिक्स यावर काय अधिकृत भूमिका घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
