Delimitation वरुन राजकीय वातावरण तापले! संसदेच्या विशेष अधिवेशनाआधी राष्ट्रवादीकडून व्हिप जारी

केंद्र सरकारने 30 नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयके आणले जाणार असल्याची चर्चा असून यावरुन राजकारण तापले आहे.

ADVERTISEMENT

Parliament Special Session On Delimitation
Parliament Special Session On Delimitation
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

संसदेत विशेष अधिवेशन

point

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून व्हिप जारी

point

राजकीय वातावरण तापले

Parliament Special Session On Delimitation : केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून, 30 नोव्हेंबरपासून लोकसभेचे, तर 2 डिसेंबरपासून राज्यसभेचे कामकाज सुरू होणार आहे. हे अधिवेशन 3 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात केंद्र सरकारकडून परिसीमन आणि महिला आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वीच देशातील राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी (27 नोव्हेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, दुसरीकडे विरोधी पक्षही विशेष अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी बैठक घेणार आहेत.

खासदारांना व्हिप जारी

दरम्यान, काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी या विधेयकाला 'संविधानावर हल्ला करण्याची तयारी' असे म्हटले आहे. यापूर्वी एप्रिल 2026 मध्येही सरकारने हे विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आवश्यक दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने विधेयक मंजूर होऊ शकले नव्हते. महिला आरक्षण लागू करण्यासाठी परिसीमनाची अट ठेवण्याऐवजी सध्याच्या 543 जागांच्या लोकसभेतच महिलांना आरक्षण लागू करावे, अशी विरोधकांची मागणी आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आपल्या सर्व खासदारांना व्हिप जारी केला आहे.

हे ही वाचा : उपचारातील निष्काळजीपणा जीवावर बेतला; इस्माईल दरबार यांच्या आईच्या मृत्यूस कारणीभूत डॉक्टरला 2 वर्षांची शिक्षा!

विरोधकांमध्ये एकमत की मतभेद?

विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी आघाडीतही वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्येक मुद्द्यावर विरोध करण्याची गरज नसल्याचे सांगत, आधी विधेयकाचा मसुदा समोर येऊ द्यावा, अशी भूमिका मांडली आहे. विधेयक देशहिताचे असल्यास चर्चेनंतर समर्थनाचा विचार करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी विरोधी आघाडीच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर विरोधकांमध्ये एकमत होणार की मतभेद वाढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : नागपूर हादरले! आधी प्रियकराला पळवून लावलं, नंतर 19 वर्षीय तरुणीवर जंगलात बलात्कार

बहुमतासाठी आकड्यांची जुळवाजुळव

दुसरीकडे, विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून बहुमताची जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा आहे. लोकसभेत सध्या 540 खासदार असून, विधेयक मंजूर करण्यासाठी 360 मतांची आवश्यकता आहे. एनडीएकडे 319 खासदार असल्याने आणखी 41 मतांची गरज आहे. तर राज्यसभेत दोन तृतीयांश बहुमतासाठी 162 मतांची आवश्यकता असून, एनडीएकडे 151 खासदार आहेत. त्यामुळे सरकारला आणखी 11 मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. यासाठी प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याची अपेक्षा सरकारला आहे. दक्षिणेकडील राज्यांच्या चिंता दूर करण्यासाठी लोकसभेच्या जागांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत वाढ करून एकूण जागा 815 ते 850 करण्याचा आणि 1971 च्या जनगणनेचा आधार कायम ठेवण्याचा पर्यायही चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.