दोन प्रियकरांच्या मदतीने पत्नीनेच रचला पतीच्या हत्येचा कट; मंगळसूत्र गहाण ठेवून विकत घेतली बंदूक

पत्नीने दोन प्रियकरांच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे. हत्येसाठी बंदूक खरेदी करण्यासाठी पत्नीने स्वतःचे मंगळसूत्र 45 हजार रुपयांना गहाण ठेवल्याचे तपासात उघड झाले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दोन प्रियकरांच्या मदतीने पत्नीनेच रचला पतीच्या हत्येचा कट

point

मंगळसूत्र गहाण ठेवून विकत घेतली बंदूक

Crime News : ओडिशामध्ये एका महिलेने आपल्या दोन प्रियकरांच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येसाठी महिलेने स्वतःचे सोन्याचे मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे मिळवले आणि त्यातून गावठी पिस्तूल खरेदी करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या दोन्ही प्रियकरांना अटक केली आहे. सुदाम नाग असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, 17 नोव्हेंबर रोजी ओडिशातील सुबरनपूर जिल्ह्यातील पंकेल छक परिसरात त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांसमोर हत्येचा कट आणि त्यामागील नियोजन उघड झाले.

हेही वाचा : 'सह्याद्रीच्या छातीत घाव घालणाऱ्यांना सोडणार नाही'; सयाजी शिंदे आक्रमक, सरकारला दिला थेट इशारा!

मंगळसूत्र स्थानिक सराफाकडे 45 हजार रुपयांना गहाण ठेवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदाम नाग यांची पत्नी कविता नाग हिचे गेल्या वर्षभरापासून त्रिलोचन बाग ऊर्फ टिंकू याच्यासोबत प्रेमसंबंध होते. याशिवाय युबराज साहू याच्यासोबतही तिचे जवळपास 12 वर्षांपासून संबंध असल्याची माहिती तपासात समोर आली. पत्नीचे त्रिलोचनसोबत असलेले संबंध सुदाम यांना मान्य नव्हते. त्यांनी त्रिलोचनला घरी येण्यास आणि कविताशी संपर्क ठेवण्यास विरोध केला होता. याच कारणातून तिघांनी मिळून सुदाम यांच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या कटानुसार कविताने आपले सोन्याचे मंगळसूत्र त्रिलोचनकडे दिले. त्याने हे मंगळसूत्र स्थानिक सराफाकडे 45 हजार रुपयांना गहाण ठेवले. या पैशांतून राउरकेला येथील एका व्यक्तीकडून गावठी पिस्तूल आणि काडतुसे खरेदी करण्यात आली. यासाठी फोनपेच्या माध्यमातून आणि रोख स्वरूपातही पैसे दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : सलग दुसऱ्यांदा पडळकरांचा गेम? सांगली भाजपमधूनच होतोय 'करेक्ट कार्यक्रम'?

तिघांनी मिळून आखलेला हत्येचा कट प्रत्यक्षात आणला

17 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सुदाम हे दुंगुरिपाली येथील पठाण गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी दिलेली दुचाकी घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी युबराज फोनद्वारे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. तो सुदाम कुठे आहेत, याची माहिती कविताला देत होता. कविता व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून त्रिलोचनच्या संपर्कात होती. ती पतीच्या ठिकाणाची माहिती त्याला देत होती. या माहितीच्या आधारे त्रिलोचनने दुचाकीवरून जात असलेल्या सुदाम यांना पंकेल छक परिसरात अडवले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. सुरुवातीला त्याने दोन गोळ्या झाडल्या. सुदाम खाली पडल्यानंतर जवळून आणखी दोन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सुदाम यांचा जागीच मृत्यू झाला. अशा प्रकारे तिघांनी मिळून आखलेला हत्येचा कट प्रत्यक्षात आणल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

पतीची हत्या झाल्यानंतर कविताने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. एका अज्ञात व्यक्तीने पतीची हत्या केल्याची तक्रार तिने पोलिसांकडे दाखल केली होती. १७ नोव्हेंबर रोजी तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. प्रत्यक्षदर्शींचे जबाब, तांत्रिक पुरावे आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्रिलोचनचा या हत्येतील सहभाग समोर आला. त्याला अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीत कविता आणि युबराज यांच्याही भूमिकेचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले गावठी पिस्तूल, सुदाम यांचा मोबाईल, अन्य पाच मोबाईल आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.