गर्भवती प्रेयसीची गळा आवळून हत्या, प्रियकराने क्रूरतेचा कळस गाठला, नेमकं काय घडलं?
Crime News : गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या 19 वर्षीय तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आली. या प्रकरणी 20 वर्षीय प्रियकराला अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गर्भवती प्रेयसीची गळा आवळून हत्या
प्रियकराने क्रूरतेचा कळस गाठला, नेमकं काय घडलं?
Crime News : गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात गर्भवती तरुणीची गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 20 वर्षीय प्रियकराला अटक केली आहे. नात्यावरून झालेल्या वादातून त्याने 19 वर्षीय प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप आहे. सपना असे मृत तरुणीचे नाव असून, ती सहा महिन्यांची गर्भवती होती. शवविच्छेदन अहवालातून तिची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : गोकुळ दूध संघ : बाजू मांडण्यासाठी वकिलाची फी 80 लाख रुपये; सरकारचा नवा जीआर काय सांगतो?
सपनाचा मृतदेह आढळून आला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर रोजी बनासकांठा जिल्ह्यातील केसरपुरा गावात सपनाचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या शरीरावर बाहेरून कोणत्याही जखमा दिसत नव्हत्या. त्यामुळे सुरुवातीला हादाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला होता. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. सपनाचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी हत्येच्या दिशेने तपास सुरू केला.
हेही वाचा : सलग दुसऱ्यांदा पडळकरांचा गेम? सांगली भाजपमधूनच होतोय 'करेक्ट कार्यक्रम'?
विजयने सपनाचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप
पोलिसांच्या तपासात सपना आणि विजय सोलंकी यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. या संबंधातून सपना गर्भवती राहिली होती. तिच्या गर्भधारणेमुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशाच एका वादादरम्यान विजयने सपनाचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपासाची मदत घेतली. तसेच दोघांच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. या तपासातून विजय आणि सपनाच्या संबंधांबाबत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली.
तपासादरम्यान पोलिसांनी विजय सोलंकी याची चौकशी केली. या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय अहवालातून सपना मृत्यूसमयी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचेही निश्चित झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 103(1) म्हणजेच हत्येची शिक्षा आणि कलम 92 म्हणजेच जन्माला न आलेल्या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरण्याशी संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी विजयला अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
