उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेतील स्थानिक राजकीय वाद आता चांगलाच चिघळला असून, महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीनंतर सुरू झालेला वाद आता थेट आगामी निवडणुकांपर्यंत पोहोचला आहे. भाजपने शिवसेनेसोबतची स्थानिक युती तोडण्याची भूमिका घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवडणुकीतील कामाला सहकार्य न करण्याची घोषणा केली. त्यानंतर शिवसेनेनेही भाजपवर जोरदार पलटवार केला आहे.
ADVERTISEMENT
उल्हासनगर महानगरपालिकेत सात स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीनंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली. या निवडीत शिवसेनेच्या वाट्याला 5 तर भाजपच्या वाट्याला 2 जागा आल्या. मात्र, संख्याबळानुसार भाजपला 4 आणि शिवसेनेला 3 जागा मिळायला हव्या होत्या, असा दावा भाजपकडून करण्यात आला. या निवड प्रक्रियेवर भाजपने आक्षेप घेत कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला. यानंतर भाजप आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष राजेश बधारिया यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेसोबत स्थानिक पातळीवर युतीत काम करणे शक्य नसल्याचे जाहीर केले. तसेच आगामी निवडणुकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाला सहकार्य न करण्याचा निर्णय घेतल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.
हे ही वाचा>> विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी जाहीर, पुण्यातून कोणाला संधी?
भाजपच्या या भूमिकेनंतर शिवसेनेनेही पत्रकार परिषद घेत जोरदार पलटवार केला. आमदार बालाजी किणीकर, महापौर अश्विनी निकम, शिवसेना नेते कमलेश निकम, राजेंद्र चौधरी आणि अरुण आसान यांनी भाजपच्या आरोपांचे खंडन केले.
भाजपचे पदाधिकारी प्रदीप रामचंदानी यांनी पत्रकार परिषदेत पप्पू कलानी यांना गँगस्टर म्हणत शिवसेनेवर टीका केली होती, त्यानंतर शिवसेनेकडून पत्रकार परिषदेत कमलेश निकम यांनी भाजपवर पलटवार करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले. रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टीची केली पाहिजे. पप्पू कलानी यांच्यावर ‘गँगस्टर’ असा उल्लेख केला जात असेल, तर रवींद्र चव्हाण यांच्या कथित जुन्या संबंधांचा मुद्दा उपस्थित करत ते मंचेकर यांचे सदस्य होते, त्यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले जावेत, असा दावा निकम यांनी केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवावे, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्राचे नव्हे तर केवळ डोंबिवलीचे प्रदेशाध्यक्ष असल्याचा आरोपही कमलेश निकम यांनी केला.
हे ही वाचा>> 'तुम्हाला सत्ता मिळाल्याचा राग नाही, पण...' राज ठाकरेंची तोफ धडाडली, थेट भाजपच्या माजी मंत्र्याची 'ती' गोष्ट सांगितली!
दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाला सहकार्य न करण्याच्या भाजपच्या भूमिकेवरही अरुण अशान आणि कमलेश निकम यांनी पलटवार केला. मागील निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी काम केले नसल्याचा दावा त्यांनी केला. त्याचवेळी शिवसेनेने भाजपच्या आमदारांना निवडून आणण्यासाठी सहकार्य केल्याचा दावा कमलेश निकम यांनी केला. आमदार सुलभा गायकवाड, रवींद्र चव्हाण आणि कुमार आयलानी यांच्या निवडणुकीत शिवसेनेने मदत केल्याचे त्यांनी सांगितले. भाजप आणि शिवसेनेमध्ये असाच संघर्ष सुरू राहिला तर आगामी निवडणुकीत भाजपच्या या तीनही आमदारांच्या विरोधात काम केले जाईल आणि त्यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी पूर्ण ताकद लावली जाईल, असा इशाराही कमलेश निकम यांनी दिला. त्यामुळे भाजपच्या श्रीकांत शिंदेंचं काम करणार नाही’ या घोषणेनंतर शिवसेनेकडूनही भाजपच्या तीन आमदारांविरोधात थेट निवडणूक लढाईचे संकेत देण्यात आले आहेत.
उल्हासनगरमधील हा वाद आता केवळ महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीपुरता मर्यादित राहिलेला नाही. महायुतीतील भाजप आणि शिवसेना हे दोन्ही घटक पक्ष असून, स्थानिक पातळीवरील सत्तेच्या समीकरणाला या संघर्षामुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. एकीकडे युती तोडून विरोधी बाकांवर बसण्याची फक्त भाषा करणारी भाजप आहे, तर दुसरीकडे शिवसेनेने भाजपच्या तीन आमदारांविरोधात आगामी निवडणुकीत काम करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे उल्हासनगरातील स्थानिक राजकारण आगामी काळात कोणते वळण घेते आणि या संघर्षाचा महायुतीच्या स्थानिक समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












