vilas ghule murder case : केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास नवनाथ घुले (वय 27) यांच्या हत्येप्रकरणी बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. रविवारी दुपारी केज पोलीस ठाण्यासमोर तसेच सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक केल्याची माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सियाच्या अशा गोष्टी की हादरुन जाल! केतनच्या आई-वडिलांनी काय सांगितलं?
चाकूने विलास घुले यांच्या पोटात वार
मिळालेल्या माहितीनुसार, विलास घुले आणि त्यांचा भागीदार आकाश चाळक हे बीड-केज राष्ट्रीय महामार्गावरील ‘गावकरी’ हॉटेल चालवत होते. शनिवारी सायंकाळी हॉटेलवर आकाश चाळक, उमेश माणे आणि आचारी गणेश प्रसाद शुक्ला उपस्थित होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आलेल्या बाबासाहेब कदम, मंगेश कदम आणि रामेश्वर गायकवाड यांनी उमेश माणे याला अनैतिक संबंधांच्या कारणावरून मारहाण करण्यास सुरुवात केली. उमेश माणे पळून जाऊ लागल्याने त्याला वाचवण्यासाठी विलास घुले आणि नितीन घुले धावले. त्यानंतर आरोपींनी त्यांचाही पाठलाग केला. समर्थ बिअर बारसमोरील राष्ट्रीय महामार्गावर सर्वांनी विलास आणि नितीन यांना अडवून मारहाण केली. याचवेळी रामेश्वर गायकवाड याने सोबत आणलेल्या चाकूने विलास घुले यांच्या पोटात वार केला.
हेही वाचा : Maharashtra Weather : पुढचे काही तास महत्त्वाचे, विजांच्या कडकडाटासह मान्सून धुमाकूळ घालणार
बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप
हल्ल्यानंतर विलास घुले यांना तातडीने केज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात आले. रविवारी दुपारी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी विलास यांचे चुलत भाऊ रमेश घुले यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दरम्यान, विलास घुले यांच्या नातेवाईकांनी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आंदोलनही करण्यात आले. सौरभ सोनवणे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी टाकळी गावातील ग्रामस्थ आणि नातेवाईक आंदोलन करत आहेत.
या प्रकरणात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणीही पुढे आली आहे. गेल्या तीन दिवसांत ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी केज येथे पाच वेळा रास्ता रोको आंदोलन केले आहे. आरोपींना अटक होईपर्यंत तसेच सौरभ सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत विलास घुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. या प्रकरणाची दखल घेत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी चर्चा करून निष्पक्ष तपास आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित करत तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे विलास घुले हत्या प्रकरणाला आता सामाजिक आणि राजकीय स्वरूप प्राप्त झाले असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT











