Tokyo Olympics 2020 : हॉकीमधलं हे मेडल क्रिकेट वर्ल्डकपपेक्षा मोठं – गौतम गंभीर

जर्मनीवर मात करुन मनप्रीत सिंगच्या भारतीय हॉकी संघाने टोकियोत इतिहास घडवला. कांस्यपदकासाठीच्या सामन्यात अटीतटीच्या लढतीत भारताने जर्मनीवर ५-४ अशी मात केली. तब्बल ४१ वर्षांनी भारतीय संघाने हॉकीत पदकाची कमाई केली. या विजयानंतर सर्व स्तरातून भारतीय संघाचं कौतुक होतंय. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने हॉकी संघाचं कौतुक करताना मोठं विधान केलं आहे. भारतीय हॉकी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:46 AM • 05 Aug 2021

follow google news

जर्मनीवर मात करुन मनप्रीत सिंगच्या भारतीय हॉकी संघाने टोकियोत इतिहास घडवला. कांस्यपदकासाठीच्या सामन्यात अटीतटीच्या लढतीत भारताने जर्मनीवर ५-४ अशी मात केली. तब्बल ४१ वर्षांनी भारतीय संघाने हॉकीत पदकाची कमाई केली. या विजयानंतर सर्व स्तरातून भारतीय संघाचं कौतुक होतंय. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने हॉकी संघाचं कौतुक करताना मोठं विधान केलं आहे.

हे वाचलं का?

भारतीय हॉकी संघाला मिळालेलं हे पदक १९८३, २००७ आणि २०११ च्या क्रिकेट विश्वचषक विजयापेक्षा मोठं आहे असं ट्विट गौतम गंभीरने केलं आहे.

ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीची कामगिरी ही कौतुकास्पद राहिलेली आहे. परंतू १९८० साली अखेरचं पदक जिंकल्यानंतर भारतीय हॉकीला उतरती कळा लागली. एकीकडे देशात क्रिकेटच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत असताना हॉकीमध्ये होणारी सुमार कामगिरी प्रत्येक भारतीयाला बोचत होती. परंतू ४१ वर्षांनी ऑलिम्पिकमधला पदकांचा दुष्काळ संपवत भारताने अखेरीस पदकांची कोंडी फोडली आहे.

सामन्यात ५-३ ने आघाडी असताना चौथ्या सत्रात जर्मनीने आक्रमक खेळाला सुरुवात करत भारतावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. भारताचा बचाव भेदून जर्मनीने ४८ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर गोलची संधी निर्माण केली. यावेळी ल्युकास विंडफेडरने श्रीजेशचा बचाव भेदत जर्मनीची पिछाडी एका गोलने कमी केली. चौथ्या सत्रात भारताच्या खेळाडूंनाही गोल करण्याच्या संधी आल्या, परंतू बॉलवर ताबा ठेवण्याच अपयश आल्यामुळे त्यांनी या संधी गमावल्या. सामना संपायला शेवटची सात मिनीटं बाकी असताना भारतीय संघ बचावात्मक पवित्र्यात गेला. यावेळी फायदा उचलत जर्मनीने बचाव भेदत पेनल्टी एरियात प्रवेश केला, परंतू श्रीजेशने यावेळी जर्मनीला बरोबरीची संधी दिली नाही.

सामना संपायला ४ मिनीटं बाकी असताना जर्मनीने आपल्या गोलकिपरला हटवत आक्रमणात आणखी एका खेळाडूची वाढ केली. ज्याचा फायदा घेत जर्मन खेळाडूंनी भारताचा बचाव भेदत सामना संपायला अडीच मिनीटं शिल्लक असताना पेनल्टी कॉर्नर मिळवला. परंतू भारतीय बचावफळीने हे आक्रमण पुन्हा एकदा परतवून लावलं. अखेरच्या काही सेकंदात जर्मनीने बॉलचा ताबा आपल्याकडे ठेवत पुन्हा एकदा शॉर्ट पासच्या सहाय्याने पेनल्टी कॉर्नरची कमाई केली. परंतू भारतीय बचावफळीने जर्मनीची ही संधी हिरावून घेत सामन्यात बाजी मारत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं.

BLOG : ४१ वर्षांच्या राखेतून भारतीय हॉकीची Olympics मध्ये ‘फिनीक्स’भरारी

    follow whatsapp