क्रिकेटमध्ये धर्म कधीपासून आला?? जाफर प्रकरणी कैफ म्हणतो…

मुंबई तक

• 06:35 AM • 13 Feb 2021

मुंबईकर आणि टीम इंडियाचा माजी ओपनर वासिम जाफरवर उत्तराखंड क्रिकेट संघटनेने, संघात मुस्लीम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप केला आहे. ड्रेसिंग रुममध्ये मौलवींना नमाज पठनासाठी बोलवत वासिमने संघातलं वातावरणही दूषित केल्याचा आरोप केला जात आहे. या सर्व घडामोडींनतर वासिमने उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. परंतू क्रिकेटच्या मैदानावर एखाद्या माजी खेळाडूविरोधात धर्माचा आधार घेऊन आरोप केल्याची ही पहिलीच […]

Mumbaitak
follow google news

मुंबईकर आणि टीम इंडियाचा माजी ओपनर वासिम जाफरवर उत्तराखंड क्रिकेट संघटनेने, संघात मुस्लीम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप केला आहे. ड्रेसिंग रुममध्ये मौलवींना नमाज पठनासाठी बोलवत वासिमने संघातलं वातावरणही दूषित केल्याचा आरोप केला जात आहे. या सर्व घडामोडींनतर वासिमने उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. परंतू क्रिकेटच्या मैदानावर एखाद्या माजी खेळाडूविरोधात धर्माचा आधार घेऊन आरोप केल्याची ही पहिलीच घटना आहे.

हे वाचलं का?

वासिम जाफरने आपली बाजू मांडताना, संघटनेचे पदाधिकारी संघनिवडीत हस्तक्षेप करत असल्याचं सांगत आपलं पद सोडलं. परंतू आपल्या कारकिर्दीत नेहमी क्रिकेटलाच धर्म मानणाऱ्या वासिम जाफरविरोधात असे आरोप होणं दुर्दैवी मानलं जातंय.

वासिम जाफरचा जुना सहकारी मोहम्मद कैफने ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये या विषयावर आपलं मत मांडत…क्रिकेटकडे खेळ म्हणूनच पाहा, त्याला दूषित करु नका असं आवाहन केलं आहे.

कैफने लिहीलेल्या लेखाचा सारांश तुमच्यासाठी देत आहोत…

खेळात धर्म कधीपासून यायला लागला?? मी उत्तर प्रदेशकडून अनेक सामने खेळलो. याव्यतिरीक्त अनेक झोन, टीम इंडिया तसेच इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेटही खेळलो. पण कधीही मला माझ्या धर्माचा विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली नाही. रन्स झाले नाही की त्याची काळजी करणं, खराब फॉर्ममध्ये मी माझ्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देणं, सामना कसा जिंकता येईल याचा विचार करणं या सर्व गोष्टी आम्ही केल्या. पण कधीही रात्री झोपत असताना माझे सहकारी माझ्या धर्माबद्दल काय विचार करत असतील हा विचारही माझ्या मनात आला नाही.

मी अलाहबादमधून आलो…माझं घर हे पंडीतांच्या घराजवळच होतं. मी इथेच क्रिकेटच्या प्रेमात पडलो. आम्ही नेहमी एकत्र खेळलो आणि याच खेळामुळे आम्ही सर्व एकत्र होतो. मी इथे भारतीय संघाचाही विचार करत नाहीये, मी माझ्या स्थानिक संघाबद्दल बोलतोय. आपल्या शेजारी-पाजारी राहणारी विविध जाती-धर्माची मुलं जेव्हा एका ध्येयासाठी मैदानात उतरायची. माझ्यातला क्रिकेटपटू अलाहबादमधील याच वातावरणामुळे घडला. क्रिकेट या खेळाची हीच खासियत आहे. प्रत्येक जात, धर्मातील खेळाडूंना हा खेळ एकत्र आणतो.

मला आठवतंय सचिन तेंडुलकरच्या किटमध्ये साई बाबांचा फोटो असायचा. लक्ष्मणच्या किटमध्येही देवांचे फोटो असायचे. झहीर खान असो किंवा हरभजन सिंह प्रत्येकाला स्वतःचा धर्म होता. सौरव गांगुली आणि जॉन राईट या जोडीने पहिल्यांदा आमच्यातले सर्व स्थानिक मतभेद दूर करत इकडे आपण पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश यांच्यासाठी खेळत नाहीयोत किंवा आपण हिंदू, मुस्लीम, शिख, ख्रिश्चन म्हणूनही खेळणार नाहीयोत. आपण सर्वजण एकमेकांसोबत भारतासाठी खेळणार आहोत ही भावना जागवली. या प्रकरणानंतर वासिम जाफरला बाहेर येऊन स्वतःला एक्सप्लेन करावं लागलं हे खूप दुर्दैवी आहे.

इज्जत आणि विश्वास या दोन गोष्टी आम्हा क्रिकेटपटूंसाठी महत्वाच्या आहेत. फॅन्स आमच्यावर ज्या पद्धतीने प्रेम करतात आणि आम्हाला ज्या पद्धतीने पाठींबा मिळतो तेच आमच्यासाठी महत्वाचं असतं. ज्यावेळेला एखादा खेळाडू करिअर संपवून प्रशिक्षकाचं काम स्विकारतो. तेव्हा संघाला उभं करताना त्याची हीच प्रतिष्ठा, ओळख पणाला लागलेली असते. मला आठवतंय, वर्ल्डकप दरम्यान जॉन राईट यांनी आमच्या ड्रेसिंग रुममध्ये Now or Never असं एक स्लोगन दिलं होतं. ध्येय असेल तर सर्व खेळाडू एकत्र येऊन मैदानावर उतरतात.

प्रार्थना करणं हा खासगी मुद्दा आहे. माझ्या कारकिर्दीत ड्रेसिंग रुममध्ये कधीही नमाझ पढला गेल्याचं मला आठवत नाही. पण काऊंटी क्रिकेट खेळत असताना ग्रॅमी हिक नावाचा माजी प्लेअर मोईन अली या आपल्या सहकाऱ्याना नमाज पढता यावा यासाठी आपला कीट सावरुन ठेवत जागा करुन द्यायचा हे मी वाचलं आहे. माझ्यासाठी धर्म आणि प्रार्थना ही खासगी आणि वैय्यक्तिक बाब आहे, मी ती कधीच ड्रेसिंग रुममध्ये नेली नाही. पण एखादा व्यक्ती जर असं करत असेल तर तो गुन्हाही ठरत नाही.

धर्म ही खूप खासगी बाब आहे आणि खेळाडूंच्या मध्ये ती कधीच येत नाही, भारतीय क्रिकेटमध्ये तरी ही बाब कधीच आली नाही. क्रिकेट हा असा खेळ हे की भारतातल्या छोट्या शहरात राहणारा मुलगाही भारतीय संघाकडून खेळण्याचं स्वप्न पाहू शकतो. असं नसतं तर महेंद्रसिंह धोनी, मुनाफ पटेल, झहीर खान यासारखे प्लेअर पुढे आलेच नसते. देशवासी म्हणून आपल्याला स्वतःशीच संवाद साधण्याची गरज आहे. आपण एकमेकांपासून स्वतःला विभक्त करु शकणार नाही. जे तरुण खेळाडू क्रिकेटमध्ये येण्याचं स्वप्न पाहत आहेत…त्यांना मी इतकच सांगेन की या सर्व गोष्टींमध्ये अडकू नका. खेळाशी प्रामाणिक रहा. आपल्या आजुबाजूला वावरताना आणि भारताकडून खेळताना नेहमी एकच स्लोगन लक्षात ठेवा…Now or Never !

    follow whatsapp