Ind vs NZ Test : पदार्पणातच मुंबईकर श्रेयसची शतकी खेळी

मुंबई तक

• 05:45 AM • 26 Nov 2021

क्रिकेट चाहत्याचं लक्ष असलेल्या श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या कसोटीतच तडाखेबंद शतक झळकावत मोठी कामगिरी केली. न्यूझीलंडविरुद्ध कानपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रेयसने शतक साकारलं. वनडे आणि टी-२० पाठोपाठ श्रेयसने कसोटीत देखील मोक्याच्या क्षणी जबाबदार खेळी करत सर्वांच लक्ष वेधून घेतलं. मात्र, शतक झाल्यानंतर 5 धावांची भर टाकून तो बाद झाला. भारताचा धडाकेबाज फलंदाज […]

Mumbaitak
follow google news

क्रिकेट चाहत्याचं लक्ष असलेल्या श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या कसोटीतच तडाखेबंद शतक झळकावत मोठी कामगिरी केली. न्यूझीलंडविरुद्ध कानपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रेयसने शतक साकारलं. वनडे आणि टी-२० पाठोपाठ श्रेयसने कसोटीत देखील मोक्याच्या क्षणी जबाबदार खेळी करत सर्वांच लक्ष वेधून घेतलं. मात्र, शतक झाल्यानंतर 5 धावांची भर टाकून तो बाद झाला.

हे वाचलं का?

भारताचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरने पहिल्याच दिवशी सुनील गावस्करांचा विक्रम मोडल्यानंतर श्रेयसने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवलं.

न्युझीलंडविरुद्ध होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्याच दिवशी भारताची 4 बाद 145 अशी अवस्था झाली होती. अशा वेळी श्रेयसने जबाबदार खेळीचं दर्शन घडवलं. श्रेयस अय्यरने जडेजासह शतकी भागिदारी करत संघाला चांगल्या स्थितीत नेले.

पहिल्या दिवशी श्रेयसने नाबाद 75 धावा केल्या होत्या. त्यामुळे पदार्पणातच तो शतक करेल असं म्हटलं जात होतं. हा अंदाज श्रेयसने खरा ठरवला. दुसऱ्या दिवसाच्या डावाला सुरूवात झाल्यानंतर पुढील 25 धावा करण्यास त्याने फार वेळ घेतला नाही. जडेजा परतल्यानंतर श्रेयसने शतक खेळी पूर्ण केली. त्याने 157 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या.

दुसऱ्या दिवशी खेळ सुरु झाल्यानंतर भारताने 90 षटकांत 5 बाद 281 धावा केल्या. त्यावेळी श्रेयस अय्यर 97 धावांवर खेळत होता. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा श्रेयसच्या शतकी खेळी पूर्ण होणार की नाही, याकडे होत्या. मात्र, श्रेयसने शतकी खेळी पूर्ण केली. त्यानंतर आर. अश्विनसोबत खेळत असतानाच 105 धावांवर श्रेयस बाद झाला. 97 षटकात साऊदीने त्याला झेलबाद केलं. श्रेयसने 171 चेंडूंचा सामना करताना 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 105 धावा केल्या.

सुनील गावस्करांचाही विक्रम मोडला

न्युझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी अनोखा योगायोग घडला. श्रेयसला सुनील गावस्करांच्या हस्ते कसोटी पदार्पणाची कॅप मिळाली. सुनील गावस्कर यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पदार्पणातील पहिल्याच कसोटी सामन्यात पहिल्या इंनिगमध्ये 65 धावा केल्या होत्या. श्रेयसने पहिल्या दिवशी 75 धावा करत त्यांचा विक्रम मोडीत काढला.

    follow whatsapp