मुंबई: टी-२० विश्वचषक २०२६च्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवलेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 253 धावांचा डोंगर उभारला होता. ज्यात संजू सॅमसन आणि फलंदाजांच्या आक्रमक फलंदाजीचा वाटा मोठा होता. पण इंग्लंडच्या संघाने देखील टीम इंडियाला अत्यंत कडवी झुंज दिली. त्यामुळे भारताला इंग्लंडवर अवघ्या 7 धावांनीच विजय मिळवता आला. या सामन्यातील सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला तो म्हणजे भारतीय ऑलराउंडर अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांनी घेतलेला विल जॅक्स कॅच.
ADVERTISEMENT
असा घेतला जॅक्सचा कॅच अन् टर्निंग पॉईंट
अक्षरने विल जॅक्सचा एक अप्रतिम रिले कॅच घेत संपूर्ण सामन्याची दिशाच बदलून टाकली. सुरुवातीला झटपट विकेट गेल्यानंतर जेकब बेथल आणि विल जॅक्स यांनी झटपट धावा करत चांगली भागीदारी केली. दोन्ही फलंदाज अत्यंत आक्रमक पद्धतीने खेळत होते. त्यामुळे सामना हा पूर्णपणे इंग्लंडच्या बाजूने झुकला होता. अशावेळी या दोन्ही फलंदाजांपैकी एकाला बाद करणं गरजेचं होतं. त्यामुळे 14 व्या ओव्हरसाठी कर्णधार सूर्यकुमारने अर्शदीप सिंहकडे बॉल सोपवला. सुरुवातीला अर्शदीपने स्वैर गोलंदाजी केली.
हे ही वाचा>> T-20 World Cup: टीम इंडियाचा नवा हिरो... सलग दोन Half Century ठोकणारा संजू सॅमसन आहे तरी कोण?
पण ओव्हरच्या शेवटचा चेंडू अर्शदीपने वाइड फुलटॉस टाकला. ज्यावर जॅक्सने डीप एक्स्ट्रा कव्हरकडे एक उंच फटका मारला. त्याच दिशेने अक्षर पटेल हा वेगाने धावत गेला आणि त्याने कॅच पकडला. पण आपण सीमारेषा ओलांडणार हे त्याला लक्षात आलं तेव्हा त्याने हातातील चेंडू शिवम दुबेकडे फेकला, जो दुबेने सहज झेलला. ज्यामुळे फॉर्मात असलेला जॅक्स बाद झाला. जॅक्सने अवघ्या 20 चेंडूत 35 धावा केल्या होत्या.
याच कॅचमुळे सामन्याचा रोख पूर्णपणे बदलला. कारण बॅथल आणि जॅक्स हे मैदानात सेट झाले होते. मात्र, जॅक्सच्या विकेटनंतर सगळा भार हा बॅथलवर आला आणि इथेच सामना भारताच्या बाजूने झुकला.
हे ही वाचा>> मोठी बातमी : टी 20 वर्ल्डकपमध्येच पाकच्या खेळाडूचं हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन; माफी मागितली, दंडही भरला
कर्णधार ब्रूकचाही घेतला अक्षरने जबरदस्त कॅच
याशिवाय अक्षरने सुरुवातीला इंग्लंडचा कर्णाधार हॅरी ब्रूक याचाही एक जबरदस्त कॅच घेतला होता. जसप्रीत बुमराहच्या स्लोअर बॉलवर ब्रूकने उंच फटका मारलेला, ज्यावर अक्षरने कव्हरमधून सुमारे 25 मीटर मागे धाव घेत डायव्हिंग कॅच घेतला होता. त्याचा हा कॅच 1983 विश्वचषक फायनलमध्ये कपिल देवने घेतलेल्या विवियन रिचर्ड्सच्या कॅचची आठवण करून देणारा होता. या कॅचने इंग्लंडचा कर्णधार ब्रूक हा अवघ्या 7 धावांवर बाद झाला, आणि इंग्लंडच्या डावाला मोठा धक्का बसला.
टीम इंडियाचा 'बापू', कोण आहे अक्षर पटेल?
अक्षर पटेल, ज्याला संघात 'बापू' म्हणून ओळखले जाते, ज्याचा जन्म 20 जानेवारी 1994 रोजी गुजरातच्या आनंद जिल्ह्यात झाला होता. तो डावखुरा फलंदाज आणि डावखुरा ऑर्थोडॉक्स स्पिनर आहे. 2012-13 हंगामात गुजरातकडून प्रथमश्रेणी आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अक्षरने 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध चेन्नईत कसोटी पदार्पण करताना त्याने पहिल्या सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये अक्षर दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो.
मुंबई इंडियन्सने 2013 मध्ये त्याला करारबद्ध केले होते, पण खेळण्याची संधी मिळाली नाही. नंतर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्सकडून त्याने उत्तम कामगिरी केली. अक्षरने भारतीय संघासाठी अनेक महत्त्वपूर्ण सामन्यात योगदान दिले आहे, ज्यात 2024 टी-20 विश्वचषक सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध 3 विकेट घेणे समाविष्ट आहे. त्याच्या अचूक गोलंदाजी आणि उपयोगी फलंदाजीमुळे तो भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनला आहे.
ADVERTISEMENT











