अयोध्या: गेल्या महिन्याभरापासून राम मंदिर दान चोरी प्रकरण देशभर गाजत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत या दान चोरी प्रकरणात तयार करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे, तपास अजून पूर्ण झाला नसला तरी प्राथमिक तपासात काय दिसून आलंय पाहूयात.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
27 एप्रिल ते 5 जून दरम्यान तपासण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 70 संशयास्पद घटना दिसून आल्या आहेत ज्यामध्ये स्टाफ पैसे लपूनछपून नेताना काही लोक दिसत आहेत. काही ठिकाणी नोटा किंवा काही ठिकाणी नोटांची बंडल्स कर्मचारी आपल्या कपड्यांमध्ये, खिशामध्ये, बुटांमध्ये घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसले आहेत. हे तर फक्त 40 दिवसांच्या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलेली माहिती सांगतोय, पण SIT च्याच रिपोर्टमध्ये म्हटलंय की बँक खाती आणि संशयितांचे जबाब नोंदवल्यावर हे स्पष्ट दिसतंय, की ही चोरी खूप आधीपासून सुरू होती.
ह्यात आतापर्यंत दोन नावं प्रामुख्याने समोर येत आहेत ती म्हणजे अविनाश शुक्ला आणि मनीष यादव. सीसीटीव्हीत हे दोघं वारंवार चोरी करताना म्हणजेच नोटा लपवताना, घेऊन जाताना दिसले आहेत. त्यांना मदत करणारे होते अनुकल्प मिश्रा, लव कुश मिश्रा आणि करुणेश पांडे.
हे ही वाचा>> समजून घ्या: भाजप आमदारालाच सोबत घेऊन शिंदेंनी कसं केलं 'ते' ऑपरेशन लोट्स?
प्राथमिक अहवालात दिसून आलंय की ज्या ठिकाणी दानपेटीतून काढलेल्या पैशांची मोजणी व्हायची तिथे येता-जाताना कोणत्याही स्वरूपाचं फ्रिस्किंग व्हायचं नाही, खरंतर अशा ठिकाणी खिसा असलेले कपडे न घालणं अपेक्षित असतं, काही ठिकाणी तसेच नियमदेखील आहेत. मात्र, इथे सीसीटीव्ही फुटेजनुसार दिसतंय की खिशातून हे कर्मचारी पेसे घेऊन चाललेत, म्हणजेच कपड्यांबाबतही कोणतंही चेकिंग धड होत नव्हतं, आणि ह्यामुळेच दानपेटीतील दानाची चोरी करणं सहज शक्य व्हायचं, असं अहवालच सांगतोय. निवृत्त बँक अधिकारी सुभाष श्रीवास्तव यांच्याकडे फ्रिस्किंगची जबाबदारी होती, मात्र त्यात पूर्णत: बेजबाबदारपणा SIT ला दिसून आलेला आहे.
अहवालात पुढे सांगण्यात आल्यानुसार आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून 78 लाख वसूल करण्यात आलेले आहेत, तेही चौकशीआधीच. म्हणजेच या आरोपींची चौकशीही झाली नव्हती तेव्हाच 78 लाख पकडले गेले असतील तर पुढे काय होईल याचा आपण फक्त विचारच करू शकतो. या काऊटिंग रूमच्या इथे जे बाथरूम आहे, तिथूनही सव्वा दोन लाख पकडले आहेत अशी माहिती आहे. यातील काही संशयित ज्यांचा पगारच 15 हजार एवढाच होता, मात्र त्यांची बँक खाती तपासली तेव्हा त्याच्यात मोठ्या प्रमाणात रक्कम दिसून आली आणि अगदी फिक्स डिपॉझिटलाही पैसे टाकलेत हे ही SIT ला दिसलं.
हे ही वाचा>> समजून घ्या: ठाकरेंच्या खासदारांनंतर आता नंबर नगरसेवकांचा? निधी वाटपातला भेदभाव पाहा!
मंदिरातील दानपेटीमध्ये देण्यात आलेलं दान स्वरूपातले पैसे आणि दागिने दोन्ही एकाच बॉक्समध्ये काऊंटिंग रूममध्ये नेलं जायचं. काऊंटिंग रूममध्ये 12 नंबरची पेटी असायची ज्यामध्ये दागिने वेगळे ठेवले जायचे. मात्र, पैसे ज्यामध्ये ठेवले जायचे त्या कॅश बॉक्सचं ट्रान्सपोर्टेशन आणि बॉक्स नंबरच्या ट्रँकिंगची काहीही व्यवस्था नव्हती. कोणत्या दानपेटीतून किती कॅश बॉक्स झाले, त्यातले किती पैशांची मोजणी झाली?
किती मोजायचे बाकी आहेत, कोणत्या दानपेटीतील किती बॉक्समधून दागिने मिळाले याचा कोणताही लेखाजोखा नव्हता. SIT चा रिपोर्ट सरळसरळ सांगतंय की सीसीटीव्ही तिथे लावला होता याचा कोणताही फायदा झाला नाही, अर्थ असा की सीसीटीव्ही असून ना तिथल्या कर्मचाऱ्यांना चोरीची भीती होती, ना सीसीटीव्ही असून चोरी होत नाहीयेना याची खातरजमा करण्यात आली.
राम मंदिर ट्रस्ट आणि बँकेदरम्यान झालेल्या MOU (सामंजस्य करार) वर बँकेच्या वतीने तत्कालीन शाखा व्यवस्थापक गोविंद मिश्रा, तर ट्रस्टच्या वतीने डॉ. अनिल मिश्रा यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. ट्रस्टच्या वतीने दानपेटीतून रक्कम काढणे, तिची मोजणी करून घेणे आणि ती बँकेत जमा करण्यासाठी डॉ. अनिल मिश्रा कार्यभार सांभाळतील म्हणून त्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली होती, मात्र याच महाशयांना SIT च्या रिपोर्टनुसार, दानपेटीतील पैशांच्या मोजणीतील हेळसांड आणि चोरीच्या प्रकाराकडे दुर्लक्ष ह्यासाठी जबाबदार धरण्यात आलं आहे.
एकूणच पाहिलं तर SIT तपासात अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष यादव, करूणेश पांडे, सुभाष श्रीवास्तव आणि रमाशंकर मिश्रा हे चोरी आणि चोरीसाठी मदद केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे तर टिन्नू यादवला षडयंत्र रचणं, चोरीसाठी मदत आणि चोरीसाठी उद्युक्त केल्याचं SIT ने म्हटलंय. रामशंकर हा तोच माणूस ज्याच्याकडे दानपेटीच्या चाव्या अनधिकृतपणे असायच्या.
पैशांपलीकडे जर इतर कोणत्या गोष्टींचं दान दिलं जात असेल तर त्याचं वजन किती, त्याचे फोटो प्रूफ किंवा त्याला सील केल्याची खातरजमा केली जायची नाही. अहवालात हे ही स्पष्ट करण्यात आलं आहे की चांदीची वीट जी दान म्हणून देण्यात आली होती ती देखील चोरीला गेल्याचे दावे सोशल मीडियावर केले जात होते, मात्र तपासात असं अजून काहीही निष्पन्न झालेलं नाही.
ADVERTISEMENT












