मुंबई: टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा (42 चेंडूत 89 धावा) करणारा संजू सॅमसन हा सामनावीर ठरला आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. केरळचा हा युवा खेळाडू आपल्या आकर्षक फलंदाजी, जबरदस्त हिटिंग आणि शांत स्वभावासाठी ओळखला जातो. टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या 97 धावांच्या खेळीने त्याने भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवले होते आणि आज पुन्हा एकदा त्याच्या सर्वाधिक धावांच्या जोरावर टीम इंडियाने 250 हून अधिक धावांचा टप्पा गाठला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडवर अत्यंत थरारक विजय मिळवला. पण त्याचा पाया हा संजू सॅमसनने रचला होता. त्यामुळे त्याची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT
कोण आहे संजू सॅमसन?
संजू विश्वनाथ सॅमसनचा जन्म 11 नोव्हेंबर 1994 रोजी केरळच्या त्रिवेंद्रम जिल्ह्यातील पुल्लुविला गावात झाला. सध्या फलंदाजी आणि विकेटकिपर असलेला संजू भारतीय राष्ट्रीय संघात व्हाइट-बॉल फॉरमॅट्सचा सदस्य आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो केरळ संघाकडून खेळतो, तर आयपीएलमध्ये 2026 च्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार आहे. यापूर्वी तो राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता आणि त्याने संघाला अनेकदा प्लेऑफमध्ये नेले होते.
हे ही वाचा>> मोठी बातमी : टी 20 वर्ल्डकपमध्येच पाकच्या खेळाडूचं हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन; माफी मागितली, दंडही भरला
संजूच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केरळमध्ये झाली. 2013 साली आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून त्याने पदार्पण केले होते आणि त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सकडूनही खेळला. 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार झाल्यानंतर त्याने 2022 मध्ये संघाला फायनलपर्यंत नेले आणि 2024 मध्ये 531 धावा करून प्लेऑफ गाठले होते. नोव्हेंबर 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला चेन्नई सुपर किंग्सकडे ट्रेड केले.
आंतरराष्ट्रीय कारकिर्द
संजूने 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आजपर्यंत त्याने 16 वनडे सामन्यांत 510 धावा केल्या आहेत. तर 61 टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत 1310 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 66 सामन्यांत 3888 धावा तर लिस्ट ए मध्ये 130 सामन्यांत 3599 धावा केल्या आहेत. 2024 मध्ये संजूने एका वर्षात तीन टी-20 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली, जो भारतीय फलंदाजासाठी विक्रम आहे.
हे ही वाचा>> धोनीचा ताबा सुटला, वेगाने कार चालवणं भोवलं, रस्त्यावर थरार अन् दंडात्मक कारवाई
बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर केलेले शतक हे भारतीय फलंदाजाचे दुसरे सर्वात वेगवान टी-20 शतक आहे. 2024 च्या टी-20 विश्वकपमध्ये त्याला एकही सामना खेळता आला नव्हता, पण २०२६ च्या विश्वकपमध्ये त्याने पुनरागमन करत वेस्ट इंडिजविरुद्ध 97* आणि इंग्लंडविरुद्ध 89 धावा करून भारताला फायनलपर्यंत पोहचवलं आहे. या खेळीने त्याने संघातील आपले स्थान पक्के केले आहे.
संजू सॅमसनची नेमकी संपत्ती किती?
संजू सॅमसनची २०२६ मध्ये एकूण संपत्ती 85 ते 100 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे, जो आयपीएल करार (18 कोटी), बीसीसीआय रिटेनर, सामना शुल्क आणि जाहिरातींमधून मिळतो.
ADVERTISEMENT











