IPL 2021 : कोलकात्याने रोखला दिल्लीचा विजयरथ, अटीतटीच्या लढतीत ३ विकेटने मारली बाजी

मुंबई तक

• 02:20 PM • 28 Sep 2021

कॅप्टन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएलच्या चौदाव्या हंगामात दिल्लीचा विजयरथ रोखण्याचं काम केलं आहे. शारजहाच्या मैदानावर शेवटच्या ओव्हर्सपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकात्याने दिल्लीवर ३ विकेटने बाजी मारत स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने चांगली सुरुवात केली. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ जोडीने ३५ धावांची पार्टनरशीप केल्यानंतर लॉकी […]

Mumbaitak
follow google news

कॅप्टन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएलच्या चौदाव्या हंगामात दिल्लीचा विजयरथ रोखण्याचं काम केलं आहे. शारजहाच्या मैदानावर शेवटच्या ओव्हर्सपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकात्याने दिल्लीवर ३ विकेटने बाजी मारत स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे.

हे वाचलं का?

पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने चांगली सुरुवात केली. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ जोडीने ३५ धावांची पार्टनरशीप केल्यानंतर लॉकी फर्ग्युसनने शिखर धवनला आपल्या जाळ्यात अडकवलं. पाठोपाठ श्रेयस अय्यरही सुनील नारायणच्या बॉलिंगवर स्वस्तात माघारी परतला. यानंतर ऋषभ पंतने स्मिथच्या साथीने संघाचा डाव सावरला.

दोन्ही फलंदाजांनी दिल्लीचा डाव सावरुन काही चांगले फटके खेळले. स्टिव्ह स्मिथ चांगल्या फॉर्मात असतानाच लॉकी फर्ग्युसनने त्याला क्लिन बोल्ड केलं, त्याने ३९ रन्स केल्या. यानंतर दिल्लीच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. एकामागोमाग एक दिल्लीचे फलंदाज हजेरी लावून परतायला लागले. कॅप्टन पंतने एक बाजू लावून धरली होती, परंतू सरतेशेवटी तो देखील रनआऊट झाला. अखेरीस निर्धारीत ओव्हर्समध्ये दिल्लीने ९ विकेट गमावत १२७ धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याकडून फर्ग्युसन, नारायण आणि अय्यर यांनी प्रत्येकी २-२ तर साऊदीने १ विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल कोलकात्याची सुरुवातही आश्वासक झाली. परंतू फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात व्यंकटेश अय्यर ललित यादवच्या बॉलिंगवर आऊट झाला. पाठोपाठ राहुल त्रिपाठीही फटकेबाजी करताना माघारी परतला. यानंतर शुबमन गिल आणि नितीश राणा यांनी छोटेखानी भागीदारी करुन कोलकात्याच्या डावाला आकार दिला. कोलकात्याची ही जोडी संघाला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच कगिसो रबाडाने गिलला आऊट केलं, त्याने ३० रन्स केल्या.

कॅप्टन मॉर्गन आणि दिनेश कार्तिकही लगेचच माघारी परतल्यामुळे कोलकात्याच्या गोटात चिंतेचं वातावरण पहायला मिळालं. परंतू एक बाजू लावून धरलेल्या नितीश राणाने सामन्यावरील पकड ढिली न होऊ देता कोलकात्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दिल्लीकडून आवेश खानने ३ तर नॉर्ट्जे-आश्विन-यादव-रबाडा यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

    follow whatsapp