आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील उत्तरार्धात पहिला अटीतटीचा सामना दुबईच्या मैदानावर पहायला मिळाला. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्ज संघाच्या हातात आलेला विजय हिसकावून घेत २ रन्सनी बाजी मारली आहे. कार्तिक त्यागीने शेवटच्या ओव्हरमध्ये भेदक मारा करुन पंजाबचा विजय हिरावून घेतला.
ADVERTISEMENT
पंजाबचा कॅप्टन लोकेश राहुलने टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय घेतला. राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल आणि एविन लुईस यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ५४ रन्सची पार्टनरशीप केल्यानंतर अर्शदीप सिंगने लुईसला माघारी धाडलं. यानंतर यशस्वी जैस्वालने संजू सॅमसनच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू इशार पोरेलने सॅमसनला स्वस्तात माघारी धाडलं राजस्थानला दुसरा धक्का दिला.
यानंतर यशस्वी जैस्वालने लिव्हींगस्टोनच्या साथीने भागीदारी करत पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला. दोघांनीही चांगली फटकेबाजी करत धावा जमवल्या. लिव्हींगस्टोन अर्शदीपच्या बॉलिंगवर आऊट झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल अर्धशतकापासून एक रन दूर असताना हरप्रीत ब्रारने त्याला आऊट केलं. यानंतर महिपाल लोमरोरने मधल्या फळीत फटकेबाजी करत राजस्थानला १८५ धावांचा टप्पा गाठून दिला. पंजाबकडून युवा अर्शदीप सिंगने ५, अनुभवी मोहम्मद शमीने ३ विकेट घेतल्या. त्यांना पोरेल आणि ब्रारने १-१ विकेट घेत चांगली साथ दिली.
प्रत्युत्तरादाखल पंजाबच्या संघाने चांगली सुरुवात केली. लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई करत पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. राहुल आणि मयांक ज्या पद्धतीने बॅटींग करत होते ते पाहता पंजाब हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. परंतू चेतन सकारियाने लोकेश राहुलला ४९ धावांवर माघारी धाडत पंजाबला पहिला धक्का दिला. दुसऱ्या बाजूने मयांकने आपलं अर्धशतक साजरं करत फटकेबाजी सुरु ठेवली होती. परंतू राहुल तेवतियाने मयांक अग्रवालला ६७ धावांवर माघारी धाडलं.
यानंतर एडन मार्क्रम आणि निकोलस पूरन यांनीही फटकेबाजी करत पंजाबचं आव्हान कायम राखलं. परंतू मुस्तफिजूर रेहमान आणि कार्तिक त्यागी यांनी शेवटपर्यंत टिच्चून मारा करत सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला. कार्तिक त्यागीने संयम राखत मोक्याच्या क्षणी दोन विकेट घेत पंजाबला पराभवाचा धक्का दिला. या विजयासह राजस्थान गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहचला आहे.
ADVERTISEMENT











