Ind vs NZ : अंधूक प्रकाशाने हिसकावला टीम इंडियाच्या हातातला विजयाचा घास

मुंबई तक

• 11:01 AM • 29 Nov 2021

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला कानपूर कसोटी सामन्यात हातात आलेला विजयाचा घास सोडून द्यावा लागला आहे. अखेरच्या दिवशी विजयासाठी १ विकेट हवी असताना पंचांनी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवल्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला आहे. २८४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ९ विकेट गमावत १६५ धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडच्या मधल्या फळीला झटपट गुंडळणारी टीम इंडिया […]

Mumbaitak
follow google news

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला कानपूर कसोटी सामन्यात हातात आलेला विजयाचा घास सोडून द्यावा लागला आहे. अखेरच्या दिवशी विजयासाठी १ विकेट हवी असताना पंचांनी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवल्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला आहे. २८४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ९ विकेट गमावत १६५ धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडच्या मधल्या फळीला झटपट गुंडळणारी टीम इंडिया रचिन रविंद्र आणि ऐजाज पटेल या जोडीला आऊट करु शकली नाही ज्यामुळे भारताला हा सामना अनिर्णित राखावा लागला आहे.

हे वाचलं का?

चौथ्या दिवसाअखेरीस न्यूझीलंडने विल यंगला गमावत ४ धावांपर्यंत मजल मारली होती. अखेरच्या दिवसात टॉम लॅथम आणि विल्यम समरवील यांनी पहिलं सत्र आश्वासक फलंदाजी करुन खेळून काढलं. दोघांनीही मैदानावर तळ ठोकून दुसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. पहिल्या सत्राअखेरीस न्यूझीलंडनेही एकही विकेट न गमावल्यामुळे सामना अनिर्णित राहणार असं चित्र निर्माण झालं होतं.

परंतू दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच उमेश यादवने समरवीलला आऊट करत न्यूझीलंडची जोडी फोडली. नाईटवॉचमन समरवीलने ३६ रन्स केल्या. दरम्यान पहिल्या डावात शतकाची संधी हुकलेल्या टॉम लॅथमने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याला केन विल्यमसनने दुसऱ्या बाजूने चांगली साथ दिली. परंतू ही भागीदारी फारकाळ टिकू शकली नाही. आश्विनने टॉम लॅथमचा त्रिफळा उडवत न्यूझीलंडला आणखी एक धक्का दिला. लॅथमने ५२ रन्सची इनिंग खेळली.

यानंतर न्यूझीलंडच्या संघाला लागलेली हळती थांबलीच नाही. केन विल्यमसन, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडल हे सर्व महत्वाचे फलंदाज झटपट माघारी परतले. ज्यामुळे मधली फळी पूर्णपणे अपयशी ठरली. जाडेजा आणि आश्विनने न्यूझीलंडच्या मधल्या फळीला सुरुंग लावत भारताचं काम आणखी सोपं केलं. अखेरच्या दिवशी १० ओव्हर बाकी असताना न्यूझीलंडच्या शेवटच्या दोन विकेट बाकी होत्या. टीम साऊदीला रविंद्र जाडेजाने आऊट करत भारताच्या विजयातलं अंतर कमी केलं.

परंतू यानंतर रचिन रविंद्रने ऐजाज पटेलच्या साथीने संयमी खेळ करत भारताच्या अडचणी वाढवल्या. पंच नितीन मेनन आणि विरेंद्र शर्मा वारंवार मैदानातील प्रकाश खेळण्यायोग्य आहे की नाही हे तपासत होते. अखेरच्या तीन ओव्हर शिल्लक असल्यामुळे न्यूझीलंडचे फलंदाज कोणतीही जोखीम न स्विकारता खेळत होते. न्यूझीलंडच्या मधल्या फळीला झटपट गुंडाळल्यानंतर अखेरच्या फळीला आऊट करण्यासाठी भारतीय गोलंदाजांना फारच काथ्याकूट करावा लागला. परंतू रचिन रविंद्र आणि ऐजाज पटेल जोडीने विकेट वाचवत निर्धारित ओव्हर्स खेळून काढत भारताच्या हातातून विजयाचा घास हिसकावून घेतला.

    follow whatsapp