१७ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी २४ तारखेला समोरासमोर येणार आहेत. सध्याच्या घडीला हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्येच खेळतात. परंतू टी-२० विश्वचषकाच्या सामन्याआधीच पाकिस्तानमध्ये भारताला हरवण्याठी जय्यत तयारी सुरु झाली आहे.
ADVERTISEMENT
पाकिस्तानच्या संघाने आगामी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला हरवलं तर एक गुंतवणूकदार पाक क्रिकेट बोर्डाला ब्लँक चेक देऊन हवी तेवढी रक्कम देणार असल्याचं पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी सांगितलं. २४ ऑक्टोबरला दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे.
भारताने ठरवलं तर पाकिस्तान क्रिकेट क्षणार्धात कोसळेल – PCB प्रमुख रमीझ राजांनी व्यक्त केली भीती
“PCB ला मिळणारा ५० टक्के निधी हा आयसीसीकडून येतो आणि आयसीसीला ९० टक्के निधी हा भारताकडून मिळतो. मला भीती आहे की जर भारताने आयसीसीला फंडींग थांबवलं तर पाकिस्तान क्रिकेट कोसळून शकतं. मला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कणखर बनवायचं आहे. एका मोठ्या गुंतवणूकदाराने मला सांगितलंय की जर पाकिस्तानने भारताला टी-२० वर्ल्डकपमध्ये हरवलं तर तो PCB ला एक ब्लँक चेक देणार आहे”, अशी माहिती रमीझ राजा यांनी दिली.
काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंड आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान दौरा रद्द केला होता, ज्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाला मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. जर आपली क्रिकेटची अर्थव्यवस्था मजबूत असेल तर आपल्याला इंग्लंड आणि न्यूझीलंडसारख्या संघांवर अवलंबून रहावं लागणार नाही. चांगली क्रिकेट टीम आणि चांगल्या अर्थव्यवस्थेसह क्रिकेट टीम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. याचसाठी आम्ही स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचं मानधन वाढवलं आहे. यासाठी आम्ही स्पॉन्सर्सच्या शोधात असल्याचंही रमीझ राजा म्हणाले.
ADVERTISEMENT
