SA vs IND : पहिला दिवस दक्षिण आफ्रिकेचा, भारताकडून विराट कोहलीची एकाकी झुंज

मुंबई तक

• 04:24 PM • 11 Jan 2022

केप टाऊन कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाअखेरीस दक्षिण आफ्रिकेने आपलं वर्चस्व निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. कर्णधार विराट कोहलीच्या एकाकी अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात २२३ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाअखेरीस आपली एक विकेट गमावत १७ धावांपर्यंत मजल मारली आहे. दुखापतीतून सावरलेल्या विराट कोहलीने तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करत टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा […]

Mumbaitak
follow google news

केप टाऊन कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाअखेरीस दक्षिण आफ्रिकेने आपलं वर्चस्व निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. कर्णधार विराट कोहलीच्या एकाकी अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात २२३ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाअखेरीस आपली एक विकेट गमावत १७ धावांपर्यंत मजल मारली आहे.

हे वाचलं का?

दुखापतीतून सावरलेल्या विराट कोहलीने तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करत टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल या जोडीने भारताला सावध सुरुवात करुन दिली. परंतू ऑलिव्हर आणि रबाडाने ठराविक अंतराने राहुल आणि मयांक अग्रवालला आऊट करत भारताच्या सलामीवीरांना माघारी धाडलं. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी उरलेलं सत्र खेळून काढत भारताची पडझड रोखली.

दुसऱ्या सत्रात चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीने भारताची बाजू चांगल्या पद्धतीने सावरली. पुजारा आणि कोहलीने काही चांगले फटके खेळत आफ्रिकेच्या गोलंदाजांवर दबाव आणला. ही जोडी मैदानात स्थिर होतेय असं वाटत असतानाच जेन्सनने पुजाराला आऊट केलं. त्याने ४३ धावांची खेळी केली. यानंतर भारतीय डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. अजिंक्य रहाणे या सामन्यातही अपयशी ठरला, अवघ्या ९ धावांवर रबाडाने त्याला माघारी धाडलं.

ऋषभ पंतने कर्णधार कोहलीला साथ देत काही चांगले फटके खेळले खरे, परंतू तो देखील जेन्सनच्या बॉलिंगवर सोपा कॅच देऊन आऊट झाला. दुसऱ्या बाजूला विराट कोहलीने आपलं अर्धशतक झळकावत आफ्रिकेच्या गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. परंतू दुर्दैवाने दुसऱ्या बाजूने त्याला योग्य ती साथ मिळाली नाही. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे आफ्रिकेचं काम सोपं झालं.

TATA उद्योगसमुह घेणार VIVO ची जागा, यंदाच्या हंगामापासून देणार स्पॉन्सरशीप

अखेरीस विराट कोहलीही रबाडाच्या बॉलिंगवर ७९ धावा काढून माघारी परतला. त्याने २०१ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि एक षटकार लगावला. एन्गिडीने शमीला आऊट करत भारताची अखेरची जोडी फोडली. आफ्रिकेकडून रबाडाने ४, जेन्सनने ३ तर ऑलिव्हर-एन्गिडी आणि केशव महाराजने १-१ विकेट घेतली. अखेरच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेनेही सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला खरा परंतू जसप्रीत बुमराहने कर्णधार डीन एल्गरला स्वस्तात माघारी धाडलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

खराब खेळासाठी माजी पाकिस्तानी कॅप्टनने पैशांची ऑफर दिली, दिग्गज स्पिनर शेन वॉर्नचा गौप्यस्फोट

    follow whatsapp