SA vs IND : राहुलच्या शतकाने संपवला भारताचा दक्षिण आफ्रिकेतला १४ वर्षांचा वनवास

मुंबई तक

• 03:12 PM • 26 Dec 2021

दक्षिण आफ्रिका दौऱ्याला भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. व्हाईस कॅप्टन पदावर प्रमोशन झालेल्या लोकेश राहुलने पहिल्याच कसोटी सामन्यात खणखणीत शतक झळकावत आपली निवड सार्थ ठरवली आहे. लोकेश राहुलच्या या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेत तब्बल १४ वर्षांनी भारतीय संघासोबत एक अनोखा योगायोग जुळून आला आहे. दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामन्यात शतक झळकावणारा लोकेश राहुल दुसरा भारतीय सलामीवीर […]

Mumbaitak
follow google news

दक्षिण आफ्रिका दौऱ्याला भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. व्हाईस कॅप्टन पदावर प्रमोशन झालेल्या लोकेश राहुलने पहिल्याच कसोटी सामन्यात खणखणीत शतक झळकावत आपली निवड सार्थ ठरवली आहे. लोकेश राहुलच्या या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेत तब्बल १४ वर्षांनी भारतीय संघासोबत एक अनोखा योगायोग जुळून आला आहे.

हे वाचलं का?

दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामन्यात शतक झळकावणारा लोकेश राहुल दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. २००७ साली केप टाऊन कसोटी सामन्यात मुंबईच्या वासिम जाफरने शतक झळकावत हा बहुमान पटकावला होता. यानंतर भारतीय सलामीवीरांना आफ्रिकेत चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. परंतू १४ वर्षांचा हा वनवास संपवत लोकेश राहुलने स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे.

कसोटी कारकिर्दीतलं लोकेश राहुलचं हे सातवं शतक ठरलं आहे. २१८ बॉलमध्ये १४ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने लोकेश राहुलने आपलं शतक पूर्ण केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे २००७ साली वासिम जाफरने झळकावलेल्या शतकानंतर तीन भारतीयांना आफ्रिकेत शतक झळकावण्याची संधी आली होती, ज्यात लोकेश राहुलचाही समावेश होता. परंतू त्या सामन्यात तो ९० धावांवर नाबाद राहिला.

त्याव्यतिरीक्त मुरली विजय ९७ आणि गौतम गंभीर ने ९३ रन्सची इनिंग खेळून वासिम जाफरच्या पंगतीत मानाचं स्थान पटकावण्याचा प्रयत्न केला होता.

रोहित शर्माला झालेल्या दुखापतीमुळे लोकेश राहुलला या दौऱ्यात उप-कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली होती. या जबाबदारीचं सोनं करत राहुलने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटीत शतक झळकावणारा राहुल तिसरा सलामीवीर ठरला आहे. त्याच्याआधी पाकिस्तानच्या सईद अन्वर आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने हा कारनामा करुन दाखवला आहे,

मयांक अग्रवालच्या तुलनेत डावाची धीम्या गतीने सुरुवात केलेल्या राहुलने नंतर मैदानावर जम बसवत पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारताची बाजू वरचढ केली.

    follow whatsapp