Pune Crime News, पुणे : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव परिसरात व्यावसायिकाची हत्या करण्यासाठी 20 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली. मात्र, मारेकऱ्यांनी नियोजित व्यक्तीऐवजी त्याच्या कामगाराचीच हत्या केली. हमजा उस्मान शेख असे हत्या झालेल्या कामगाराचे नाव आहे, तर विकास नवले हे सुपारी देऊन हत्या करण्याचे लक्ष्य होते. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. या तपासातून जमिनीचा वाद, स्टोन क्रशर आणि रस्त्याच्या वापरावरून सुरू असलेला संघर्ष समोर आला. संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT
हेही वाचा : UPI व्यवहारांवर MDR शुल्काबाबत मोदी सरकारने घेतला सगळ्यात मोठा निर्णय!
नवले यांचा फेसबुकवरील फोटोही आरोपींमध्ये पाठवण्यात आला
विकास नवले यांचे रांजणगाव एमआयडीसी परिसरात विविध व्यवसाय आणि जमिनी आहेत. त्यांचा स्टोन क्रशरचा व्यवसायही आहे. त्याच परिसरात सार्थक कोहकडे याचाही स्टोन क्रशर असून, दोघांच्या जमिनी शेजारी आहेत. मालवाहू वाहनांच्या येण्या-जाण्यासाठी सामायिक रस्त्याचा वापर आणि जमिनीच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता. या वादातून सार्थक कोहकडे याने विकास नवले यांना संपवण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने आपला मित्र तुषार तोडकर याच्याशी संपर्क साधला. तोडकरने पुढे संतोष मांजरे याला या कामाची जबाबदारी दिली. मांजरे याने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन नवले यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. नवले हे दररोज सकाळी साधारण सहा वाजण्याच्या सुमारास घराजवळील पाण्याच्या टाकीचा नळ सुरू करण्यासाठी जात असत. परिसरातील कामगारांसाठी त्यांनी सुमारे 400 खोल्या बांधल्या होत्या. त्यांच्या रोजच्या वेळेची माहिती कोहकडे याला होती. नवले यांचा फेसबुकवरील फोटोही आरोपींमध्ये पाठवण्यात आला होता. जवळपास तीन आठवडे त्यांच्या हालचालींची पाहणी करण्यात आली.
हेही वाचा : आमदार गोपीचंद पडळकरांना मोठा झटका, महायुतीच्या मनसुब्यांनाही सुरुंग
हल्लेखोरांना आपण नियोजित व्यक्तीचीच हत्या केल्याचे वाटले
मात्र, हत्या करण्याच्या नियोजित दिवसाच्या दोन दिवस आधी विकास नवले यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे ते नेहमीच्या ठिकाणी गेले नाहीत. त्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या हमजा उस्मान शेख याला सकाळी सहा वाजता पाण्याच्या टाकीचा नळ सुरू करण्यासाठी पाठवले. शेख तेथे पोहोचताच दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांना आपण नियोजित व्यक्तीचीच हत्या केल्याचे वाटले. प्रत्यक्षात त्यांनी नवले यांच्याऐवजी त्यांच्या कामगाराला लक्ष्य केले होते. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील रस्त्यांवरील सीसीटीव्ही चित्रण तपासले. तपासात एका अल्टो कारचा आणि क्रमांक नसलेल्या दुचाकीचा धागा मिळाला. त्यानंतर चाकण आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून आरोपींचा शोध घेण्यात आला.
तपासादरम्यान संतोष मांजरे याचे नाव समोर आले. तो उत्तर प्रदेशात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तुषार तोडकर आणि सार्थक कोहकडे यांच्यापर्यंत तपास पोहोचला. विकास नवले यांची हत्या करण्यासाठी 20 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे या प्रकरणातील तपासातून समोर आले. या कटात मांजरेच्या साथीदारांचाही सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. हमजा शेख यांच्या पत्नीने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर रांजणगाव पोलिसांनी तपास सुरू केला होता. व्यावसायिकांमधील जमिनीचा आणि स्टोन क्रशरचा वाद, लक्ष्य व्यक्तीची माहिती, फेसबुकवरील फोटो आणि अनेक दिवसांची रेकी करूनही हल्लेखोरांनी चुकीच्या व्यक्तीची हत्या केली. नियोजित हत्या अयशस्वी ठरल्यामुळे संपूर्ण कट उघडकीस आला.
ADVERTISEMENT












