टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध सामना मैदानात नाही तर ‘इथे’च हरला?

मुंबई तक

• 04:10 AM • 25 Oct 2021

दुबई: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताला आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. टीम इंडियाचा हा पराभव फक्त संघालाच नव्हे तर अवघ्या देशाला बोचणारा आहे. आजवर एकाही विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभव न पत्करलेल्या भारतीय संघाला कालच्या सामन्यात अत्यंत लाजिरवाण्या पद्धतीने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता क्रिकेट रसिकांकडून टीम इंडियावर जोरदार टीका सुरु झाली आहे. या सगळ्यात […]

Mumbaitak
follow google news

दुबई: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताला आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. टीम इंडियाचा हा पराभव फक्त संघालाच नव्हे तर अवघ्या देशाला बोचणारा आहे. आजवर एकाही विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभव न पत्करलेल्या भारतीय संघाला कालच्या सामन्यात अत्यंत लाजिरवाण्या पद्धतीने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता क्रिकेट रसिकांकडून टीम इंडियावर जोरदार टीका सुरु झाली आहे.

हे वाचलं का?

या सगळ्यात आता वेगवेगळ्या चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. अनेकांच्या मते, भारतीय संघ हा मैदानात नव्हे तर त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेतच सामना गमावून बसला होता. चला जाणून घेऊयात अशी चर्चा का सुरु आहे.

क्रिकेट फक्त बॅट आणि बॉलने खेळण्याचा खेळ नाहीए. तर क्रिकेट हा खेळ बुद्धी चातुर्य आणि प्रतिस्पर्ध्याविरोधात मानसिकदृष्ट्या खेळण्याचा खेळ आहे. पण याच बाबतीत भारतीय संघ कमी पडला असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. भारतीय संघ मैदानावर नव्हे तर त्याआधी पत्रकार परिषदेतच सामना गमवला होता. याबाबत आपण जाणून घेऊयात मात्र, अशी चर्चा का आहे यासाठी आधी एक उदाहरण पाहूयात.

आपल्याला एम. एस. धोनी – द अनटोल्ड स्टोरी हा सिनेमा तर माहितीच असेल. या सिनेमा धोनीच्या कारकीर्दीतील अनेक महत्त्वाच्या मॅचेस आणि काही खास गोष्टींचा उल्लेख आला आहे. याच सिनेमातील एक सीन तुम्हालाही लक्षात असेल. तो म्हणजे.. जेव्हा धोनी पंजाबविरुद्ध मॅच खेळतो तो.

कूच बिहारी ट्रॉफीमध्ये धोनी हा बिहार संघाकडून खेळत असताना त्यांचा सामना पंजाबशी होतो. यावेळी पंजाबचं नेतृत्व हे युवराज सिंगकडे असतं. यावेळी बिहारला देखील लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. याच मॅचबाबत जेव्हा धोनी आपल्या मित्रांना काही गोष्टी सांगतो. तेव्हा तो म्हणतो की, आम्ही सामना मैदानात नाही तर बास्केट बॉल कोर्टवरच गमावला..

‘दुसऱ्या दिवशी आमचा संपूर्ण संघ हा 357 रन्सवर ऑलआऊट झाला. नंतर पंजाब बॅटिंगला येतं आणि त्यांची पहिली विकेट पडते 60 रन्सवर. नंतर बॅटिंगला येतो युवराज सिंह. दुसऱ्या दिवसाचा स्कोअर 108 वर 1. संपूर्ण दिवसात त्यांची एकच विकेट जाते. तिसऱ्या दिवशी युवराज डबल सेंच्युरी झळकावतो. खूप झोडलं त्याने… शेवटच्या दिवशी पंजाबचा एकूण स्कोअर 839. युवराजचा एकट्याचा स्कोअर 358. संपूर्ण बिहार संघाच्या स्कोअरपेक्षा एक रन जास्त. तुम्हाला माहितेय आम्ही मॅच कुठे हरलो? क्रिकेट ग्राऊंडवर नाही तर रात्री बास्केट बॉल ग्राऊंडवर. (इथेच बिहारचे खेळाडू हे युवराजला पाहतात आणि त्याचं कौतुक करतात.)

धोनीच्या मते बिहारने तो सामना गमवला त्याचं कारण त्यांचे खेळाडू हे युवराजसमोर मानसिकदृष्ट्या कमकुवत झाले होते.

आता आपण वळूयात भारतीय संघाच्या कालच्या सामन्यातील पराभवाकडे. भारतीय संघ पाकिस्तानला सहज धूळ चारेल असंच सगळ्यांना वाटत होतं. पण झालं भलतंच.. पाकिस्तानने तब्बल 10 गडी राखून भारतावर विजय मिळवला. पण भारताने हा मैदानावर नाही तर त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेतच गमावला. कारण या पत्रकार परिषदेत कर्णधार कोहलीने केलेलं एक वक्तव्य भारतीय संघाची या सामन्यापूर्वी नेमकी काय मनस्थिती होती हेच दर्शवत होतं.

भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पहिल्या चेंडूपासून कुठेही वरचढ दिसला नाही. प्रत्येक वेळी पाकिस्तानचे खेळाडू सरस खेळ करत असल्याचंच दिसून आलं. भारतीय संघाची अशी स्थिती का झाली हे या घडीला तरी सांगता येणार नाही. मात्र, संघात सारं काही आलबेल नसल्याचंच यावरुन दिसतं आहे.

कारण, या सामन्याआधी जी पत्रकार परिषद झाली तेव्हाच कर्णधार विराट कोहली असं म्हणाला होता की, ”सामन्याच्या दिवशी तुम्ही कसे खेळता यावर सर्व काही अवलंबून असते. पाकिस्तानचा संघ खूप मजबूत संघ आहे, त्यांच्याविरुद्ध तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ करावा लागेल. पाकिस्तानकडे असे खेळाडू आहेत जे ऐनवेळी सामना फिरवू शकतात.’ विराटचं हेच वक्तव्य खूप महत्त्वाचं असल्याचं आता बोललं जात आहे.

T20 WC, Ind Vs Pak: कोहली म्हणतो, ‘पाकिस्तानची टीम मजबूत, त्यांच्याकडे गेम चेंजर देखील आहेत’

क्रिकेटच्या मैदानावर सामना हा तुम्हाला मानसिक कणखरतेच्या बळावर देखील जिंकावा लागतो. पण भारतीय संघ इथेच कमी पडल्याचं दिसून आलं आणि म्हणूनच टीम इंडिया मैदानावर नव्हे तर पत्रकार परिषदेतच सामना गमावून बसल्याची आता चर्चा रंगू लागली आहे.

    follow whatsapp