मुंबई : भारताने पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) जिंकल्यानंतर संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना एकूण 51 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सोमवारी (दि.2) केली. भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर BCCI ने महिलांच्या क्रिकेट संघासाठी अभूतपूर्व बक्षीस जाहीर करत ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर बीसीसीआयने महिला संघासाठी पेटारा उघडलाय.
ADVERTISEMENT
शफालीची अंतिम सामन्यात दिमाखदार कामगिरी
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवालाय. या अंतिम सामन्यात युवा खेळाडू शफाली वर्मा हिने दिमाखदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. प्रतिक रावलच्या जागी तिला अखेरच्या क्षणी संघात स्थान मिळालं होतं, पण तिने संधीचं सोनं केलं. शफालीने 87 धावांची जबरदस्त खेळी केली आणि नंतर गोलंदाजीतही दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. तिने सून लूस आणि मारीझाने कॅप या अनुभवी खेळाडूंना बाद करत भारताला विजयाकडे नेलं. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने 298 धावा केल्या आणि आफ्रिकेसमोर 299 धावांचे आव्हान ठेवले. मात्र, आफ्रिकेला टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना 246 धावाच करता आल्या.
हेही वाचा : 21 वर्षाच्या पोरीची कमालच, भारतीय संघाची रणरागिणी.. ऐनवेळी गेमच फिरवणारी शेफाली आहे तरी कोण?
देवजीत सैकिया यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “गेल्या महिन्यात आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी महिलांच्या क्रिकेटसाठीच्या पारितोषिक रकमेत तब्बल 300 टक्क्यांनी वाढ केली आहे. यापूर्वी ही रक्कम 3.88 दशलक्ष डॉलर्स इतकी होती, जी आता 14 दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त बीसीसीआयने भारतीय संघ — खेळाडू, प्रशिक्षक, निवड समिती आणि सपोर्ट स्टाफ यांना एकत्रितपणे 51 कोटी रुपयांचं बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी घोषणा त्यांनी केली.
यंदाचा विश्वचषक विशेष ठरला आहे, कारण पुरुष आणि महिला विश्वचषकासाठी प्रथमच समान पारितोषिक रक्कम देण्यात आली आहे. हे आयसीसीने दिलेल्या "जेंडर पे पॅरिटी"च्या वचनाची पूर्तता आहे. इतकंच नव्हे, तर यंदाच्या महिला विश्वचषकातील एकूण पारितोषिक निधी 2023 च्या पुरुष विश्वचषकापेक्षा (84 कोटी रुपये) जास्त आहे.
भारताच्या या ऐतिहासिक विजयाने महिलांच्या क्रिकेटमध्ये एक नवं पर्व सुरू झालं आहे. देशभरात महिला खेळाडूंच्या या कामगिरीचं कौतुक होत आहे. बीसीसीआयचं 51 कोटींची रक्कम हे केवळ आर्थिक बक्षीस नसून, भारतीय महिला क्रिकेटच्या वाढत्या सामर्थ्याला दिलेला सन्मान मानला जातो. भारतीय महिला संघाने हा विजय मिळवून देशाच्या अब्जावधी क्रिकेटप्रेमींचं स्वप्न साकार केलं आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे महिला क्रिकेटला अधिक प्रतिष्ठा आणि प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











