21 वर्षाच्या पोरीची कमालच, भारतीय संघाची रणरागिणी.. ऐनवेळी गेमच फिरवणारी शेफाली आहे तरी कोण?
Who is Shafali Verma: भारतीय महिला क्रिकेट संघाची ओपनर आणि फिरकीपटू शेफाली वर्मा हिने तिच्या अष्टपैलू कामगिरी भारतीय संघाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून दिली आहे. जाणून घ्या कोण आहे शेफाली वर्मा.
ADVERTISEMENT

नवी मुंबई: महिला विश्वचषक 2025 मध्ये भारतीय संघाने द. आफ्रिकेला पराभूत करत पहिल्यांदाच विश्वचषक पटकावला. पण या अंतिम सामन्यात ऐनवेळी संघात आलेल्या शेफाली वर्माने अशी चमकदार कामगिरी केली की, ज्यामुळे केवळ सामनाच नाही तर थेट विश्वचषकालाच गवसणी घातली. सेमीफायनल सामन्याआधी प्रतिका रावल ही दुखापतग्रस्त झाल्याने शेफाली वर्माला संघात स्थान देण्यात आलं.
विश्वचषक स्पर्धेत अवघे 2 सामने खेळायला मिळालेले असतानाही शेफालीने केवळ आपल्या फलंदाजीनेच नाही तर गोलंदाजीने देखील भारतीय संघाला विजय मिळवून दिला. जाणून घेऊया कोण आहे शेफाली वर्मा.
शेफाली वर्मा ही भारतीय महिला क्रिकेट संघाची एक प्रमुख ओपनर बॅट्समन असून, तिची आक्रमक खेळी आणि धैर्य भारतीय क्रिकेटला नवे वळण देणारी आहे. 2025 च्या आयसीसी महिला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाने 52 धावांनी विजय मिळवून पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला, आणि या विजयात शेफालीने अत्यंत मोलाची कामगिरी केली. तिने फक्त बॅटिंगनेच नव्हे, तर बोलिंगनेही संघाला मजबूत आधार दिला.
प्रारंभिक जीवन आणि संघर्ष
शेफाली वर्मा यांचा जन्म 28 जानेवारी 2004 रोजी हरियाणातील रोहतक येथे झाला. तिचे वडील संजीव वर्मा हे क्रिकेटप्रेमी असून, ते छोट्या ज्वेलरी शॉपचे मालक आहेत. आईचे नाव प्रवीण बाला आहे. शेफालीला एक मोठा भाऊ साहिल (लेग स्पिनर) आणि एक छोटी बहीण नॅन्सी आहे. संपूर्ण कुटुंब क्रिकेटशी जोडलेले आहे. वडिलांच्या आग्रहाने शेफालीने 8 व्या वर्षी क्रिकेट सुरू केले, पण रोहतकमधील अकादमी मुलींना प्रवेश देण्यास तयार नव्हतं. त्यामुळे तिने मुलाच्या वेशात (केस छोटे करून) श्री राम नारायण क्रिकेट अकॅडमीत प्रवेश घेतला. नंतर तिने स्वतंत्रपणे सराव केला आणि लहान वयातच U-12 स्पर्धेत भाऊ आजारी पडल्यावर त्याच्या जागी खेळली. हा संघर्ष तिच्या धैर्याची साक्ष देतो.










