इंग्रजांना जेरीस आणणाऱ्या तात्या टोपेंची संघर्षगाथा

१८५७ ला झालेल्या उठावात तात्या टोपे यांचं मोलाचं योगदान होतं
इंग्रजांना जेरीस आणणाऱ्या तात्या टोपेंची संघर्षगाथा
फोटो सौजन्य-ट्विटर

भारताला स्वातंत्र्य मिळालं १९४७ ला. मात्र या १९४७ च्या आधीही एक मोठा उठाव झाला होता. तो उठाव होता १८५७ चा उठाव. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या ९० वर्षे आधीच हा उठाव झाला होता. या उठावात जर फंदफितुरी झाली नसती तर भारताला त्याच वर्षी स्वातंत्र्य मिळालं असतं. या उठावात आणि उठावानंतर सुमारे १० ते १२ महिने इंग्रजांना शेवटपर्यंत नाकी नऊ आणणारे सेनानी होते तात्या टोपे. तात्या टोपे यांची आज १६३ वी पुण्यतिथी आहे तरीही अवघा देश त्यांचं ऋण विसरलेला नाही.

फोटो सौजन्य-ट्विटर

कोण होते तात्या टोपे?

तात्या टोपे यांचं मूळ नाव रामचंद्र पांडुरंग टोपे असं होतं. महाराष्ट्रातल्या येवला या ठिकाणी मराठी कुटुंबात तात्या टोपे यांचा जन्म झाला. त्यांना प्रेमाने तात्या म्हणत असत. त्यामुळे पुढे त्यांचं तेच नाव प्रचलित झालं, एवढंच नाही तर इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं.

तात्यांचे वडील पांडुरंग टोपे हे पेशव्यांच्या दरबारात दानाध्यक्ष म्हणून काम करत होते. पांडुरंग टोपे हे भट हे आडनाव लावत होते. त्यांना एकूण आठ मुलं होती. त्यापैकीच एक तात्या टोपे होते. तात्यांचे वडील पांडुरंग हे अत्यंत विद्वान आणि चतुर व्यक्ती होते. पेशव्यांनी त्यांचा रत्नजडीत टोपी देऊन सन्मान केला. त्यामुळे त्यांना टोपे असं संबोधलं जाऊ लागलं. पुढे तेच त्यांचं आडनाव झालं.

फोटो सौजन्य-ट्विटर

पेशवाई अस्ताला जात होती. त्याचवेळी दुसरे बाजीराव पेशवे हे ब्रह्मवर्तास गेले. तात्या टोपे यांनी पेशव्यांच्या दरबारातही स्थान मिळवलं होतं. नानासाहेब पेशवे यांचे ते प्रमुख सल्लागार होते. १८५७ च्या क्रांतीयुद्धात इंग्रजांना एकाकी आणि तेवढीच प्रभावी झुंज दिली ती तात्या टोपे यांनीच. १८५७ मध्ये त्यांची पेशव्यांचे सेनापती म्हणून निवड करण्यात आली. हीच वेळ होती की त्यामुळे भारताला एक महान योद्धा त्यांच्या रूपाने मिळाला.

१८५७ मध्ये नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत इतर सैन्याला सोबत घेऊन ब्रिटिशांच्या विरोधात आघाडी उभारली. त्यांची ही आघाडी इतकी सक्षम आणि आक्रमक होती की अल्पावधीतच त्यांनी इंग्रजांकडून काही ठाणी काबीज केली.

ब्रिटिश व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले हे आपल्याला माहित आहेच. त्यांना व्यापारापुरतंच मर्यादित ठेवलं पाहिजे ही दूरदृष्टी छत्रपती शिवराय ते पहिल्या बाजीराव पेशव्यांपर्यंत सगळ्यांनीच दाखवली. तसंच मराठेशाहीला सुरुंग लावणं हे वाटतं तितकं सोपं नाही हे इंग्रजांनाही माहित होतं. त्यामुळेच त्यांनी या वाट्याला जाण्याची हिंमत दाखवली नाही. मात्र तैनाती फौज आणून त्यांनी आपले सूप्त मनसुबे पूर्ण करण्यास म्हणजेच देश काबीज करण्यास सुरूवात केली.

एखाद्या राजाने जर तैनाती फौज आणि त्यांच्या अटी स्वीकारल्या तर त्याचा अर्थ हाच होत होता की ते राजे इंग्रजांचे मांडलिक होत. ते फक्त नामधारी राजे राहात बाकी राज्याचा संपूर्ण कारभार करण्यासाठी त्यांना ब्रिटिशांची संमती घ्यावी लागत होती. ब्रिटिशांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडून त्यांचंही राज्य हिसकवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांसमोर गुडघे टेकले नाहीत तर बंड पुकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अगदी तसाच एक धगधगता अंगार होती झाशीची राणी लक्ष्मीबाई. मेरी झाशी नहीं दुँगी म्हणत तिनेही इंग्रजांच्याविरोधात युद्धाचा शंख फुंकला.

फोटो सौजन्य-ट्विटर

इकडे दुसरे बाजीराव युद्ध हरले तेव्हा इंग्रजांनी त्यांना राज्यातून काढून टाकलं आणि बिठूरला पाठवलं. त्यानंतर त्यांचे अत्यंत विश्वासू असलेले पांडुरंग टोपे म्हणजेच तात्या टोपेंचे वडील हे देखील बिठूरला गेले. त्यामुळे तात्या टोपेही तिथेच वडिलांसोबत गेले. तात्या टोपे हे पेशव्यांकडे कारकून म्हणूनही काम करत होते. या पदावर असताना त्यांनी एका भ्रष्टाचारी कर्मचाऱ्याला पकडलं. तात्या टोपे हे जेव्हा रणसंग्रमात उतरले तेव्हा त्यांनी छत्रपती शिवरायांची गनिमी कावा पद्धत वापरली. १८५७ चा उठाव शमल्यानंतरही सुमारे १० महिने त्यांनी इंग्रजांना गुंगारा दिला.

ब्रिटिशांनी जेव्हा झाशीला वेढा दिला आणि झाशीची कोंडी केली तेव्हा पेशव्यांनी तात्या टोपेंकडे राणीला मदत करण्याची जबाबदारी दिली होती. तात्या टोपे यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा प्रसंग मानला जातो. तात्या टोपे झाशीसाठी निकराने लढले मात्र त्यांना या लढाईत यश आलं नाही.

१८५७ च्या समरात ग्वाल्हेरहून तात्यांनी आणलेल्या सैन्यावर मुख्य सेनापती म्हणून नानासाहेबांनी त्यांचीच निवड केली. त्या वेळी तात्यांच्या कर्तृत्वाचा कस लागला. कानपूरवर चढाई करण्यासाठी तात्या सज्ज झाले.

१८५७ मधील दिल्ली, लखनौ, जगदीशपूर आणि कानपूर या ठिकाणच्या उठावांचे मुख्य सूत्रधार हे तात्या टोपेच होते. त्यांचा धाडसी स्वभाव, गनिमी काव्याचे अवगत तंत्र, स्वदेशावरची श्रद्धा आणि स्वामिनिष्ठा यांच्या बळावर त्यांच्या तलवारीला धार आली होती. कानपूर, लखनौ, झाशी असे कूच करताना तात्यांचा पराक्रम पणाला लागला. कमकुवत सैन्य, नियोजनाची कमतरता, पैसा-रसद-तोफा या साधनांची कमतरता असताना त्यांना यशापयशाची चव चाखायला लागत होती. पण तात्यांची ध्येयासक्ती प्रचंड होती.

नानासाहेब पेशवे यांचा अज्ञातवास, ग्वाल्हेरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंचा पराभव यामुळे खचून न गेलेले तात्या टोपे हे शत्रूला तोंड देत होते. शत्रूवर जरब बसवत, वेळोवेळी इंग्रजांच्या तावडीतून सुटून पुढचे ध्येय गाठण्याचा त्यांचा यत्न इंग्रजांना मेटाकुटीला आणत होता. तात्यांच्या या पराक्रमाची गाथा जगभर पसरली. काही युरोपियन इतिहासकारांनी तात्यांच्या शौर्याचा गौरव त्या काळी केला होता.

झाशीच्या राणीचा पराभव आणि मृत्यू झाल्यानंतरही आपला संघर्ष तात्या टोपे यांनी सुरूच ठेवला. १८५७ चं बंड इंग्रजांनी फितुरीच्या जोरावर मोडून काढलं. मात्र तात्या टोपे काही लवकर इंग्रजांना सापडले नाहीत. त्यामुळे त्यांना शोधण्याची मोहीम इंग्रजांनी आणखी जोशाने राबवली. तात्या टोपे यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी जंग जंग पछाडलं पण ते अपयशी ठरत होते. उठाव मोडला तरीही तात्या टोपे हे इंग्रजांशी झुंजत होते.

असं म्हटलं जातं की तात्या टोपे हे पाडौन येथील जंगलात होते तेव्हा ब्रिटिश सैन्याने त्यांना पकडलं. नरवरचे राजे मनसिंग यांनी इंग्रजांना तात्या जंगलात लपले आहेत हे सांगितलं होतं. तात्या टोपे यांना पकडल्यानंतर त्यांच्यावर एक खटला भरवण्यात आला. ज्यामध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. १८ एप्रिल १९५९ म्हणजेच आजच्या दिवशी त्यांना फाशी देण्यात आली. तात्या टोपे यांच्या मृत्यूचा हा दिवस बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो.

तात्या टोपे यांनी इंग्रजांच्या विरोधात छोट्या मोठ्या मिळून सुमारे १०० हून अधिक लढाया आणि उठाव केले. त्यामुळे इंग्रजांचं मोठं नुकसान झालं होतं. हजारो सैनिक या लढायांमध्ये मारले गेले. तात्या टोपे यांच्याविरोधात जो खटला इंग्रजांनी चालवला त्यात तात्या टोपे यांनी सगळ्या आरोपांना अत्यंत बेडरपणे उत्तरं दिली. कोणत्याही आरोपांना उत्तर देताना त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज हे त्यांच्या मनात असलेला देशाभिमान सांगून जाणारं होतं असंही इतिहासकारांनी लिहून ठेवलं आहे.

१८५७ चा उठाव हे स्वातंत्र्यासाठी पेटलेलं पहिलं अग्नीकुंड होतं. या अग्निकुंडात आपल्या प्राणांची आहुती देऊन ते उठाव संपल्यावर धगधगतं ठेवण्याची मोलाची कामगिरी तात्या टोपे यांनी केली. त्यामुळेच त्यांचं हे योगदान देश आजही विसरलेला नाही.

Related Stories

No stories found.