आषाढी वारी २०२२ : मुख्यमंत्री शिंदेंनी केली विठ्ठलाची महापूजा, वारकरी नवले दाम्पत्याला मिळाला मान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल रुख्मिणीची शासकीय महापूजा, बीड जिल्ह्यातील दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विठ्ठल-रुख्मिणीची महापूजा करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विठ्ठल-रुख्मिणीची महापूजा करण्यात आली.

'पंढरीच्या सुखा अंतपार नाही लेखा' असं म्हणत पंढरपुरात पोहोचलेल्या वारकऱ्यांच्या भक्तिरसात भूवैकुंठ नगरी न्हाऊन निघाली. लाखो भाविकांच्या साक्षीने आषाढी एकादशीनिमित्त आज विठ्ठल रुख्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठू माऊली आणि रुख्मिणी मातेची पहाटे पूजा करण्यात आली.

यंदा बीड जिल्ह्यातील रूई गावचे मुरली व जिजाबाई नवले या वारकरी दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले. नवले दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठल रुख्मिणीची महापूजा करण्याचा मान मिळाला.

'बा... विठ्ठला राज्यात सुख, समृद्धी आणि शांतता नांदू दे आणि शेतकरी सुखी होऊ दे,' असं साकड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुखमाईला घातलं.

कोरोना नंतर दोन वर्षांनी आषाढी यात्रेचा नेत्रदीपक सोहळा पंढरपुरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे दहा लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.

विठू नामाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून गेली असून, आषाढीनिमित्त पवित्र स्नानाची पर्वणी साधण्यासाठी चंद्रभागेचा तीर वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला. पंढरपुरात जणू भक्तीचा महापूर आला आहे.

पंढरपुरातील मठ, मंदिरे आणि धर्मशाळांमधून विठू नामाचा जयघोष सुरू आहे. टाळ, मृदुंगाच्या गजराने पंढरीचा आसमंत दणाणून गेला आहे. दोन वर्षानंतर आषाढी यात्रा होत असलेल्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनाचा आस लागलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर दर्शन घेताना आनंद ओसंडून वाहत आहे.

विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरापर्यंत गेली आहे. सध्या दर्शनासाठी सात ते आठ तासांचा कालावधी लागत आहे. तर मुखदर्शनासाठीही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

आज पहाटे दिंड्यांनी विठू नामाच्या जयघोषात नगर प्रदक्षिणा पूर्ण केली. पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल व रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.

त्यानंतर मंदिरातील सभामंडपात मानाचे वारकरी मुरली नवले व त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना एक वर्षाचा एसटीचा मोफत प्रवास पास भेट देऊन त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

"पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे. येथे येणारा भाविक गरीब आहे. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते आदी प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय मंदिर व परिसराचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. प्रारंभी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in