पुण्यात लवकरच हवेतून उडणारी बस, वाहतूक कोंडीवर नितीन गडकरींनी सांगितला उपाय

जाणून घ्या या नव्या योजनेबाबत नितीन गडकरी यांनी काय सांगितलं आहे?
Union Minister Nitin Gadkari
Union Minister Nitin Gadkari

पुण्यात उडत्या बसेसची योजना आणण्याची तयारी आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. नितीन गडकरी हे आज पुण्यात होते. तिथे वाहतूक कोंडीबाबत चर्चा करत असताना नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करत असताना लवकरच ही योजना पुण्यात आणावी असं नितीन गडकरींनी सुचवलं आहे.

पुण्यात वाहतूक कोंडीची गंभीर समस्या

पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. पुण्याप्रमाणेच इतर महानगरांमध्येही ही समस्या भेडसावते आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सगळ्याच महापालिका आणि स्थानिक प्रशासन प्रयत्न करत आहेत. अशात पुण्यातल्या वाहतूक कोंडीवर आता नितीन गडकरी यांनी उडत्या बसचा पर्याय सांगितला आहे. उडत्या बसची योजना आणली तर वाहतूक कोंडी नक्कीच कमी होईल असं नितीन गडकरी यांनी सुचवलं आहे. पुण्यातल्या चांदणी चौकात वाहतूक समस्या आणि इतर मुद्द्यांवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नितीन गडकरी यांनी हा उपाय सुचवला आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत नितीन गडकरी?

पुण्यात उडत्या बसेसची योजना आणली तर पुण्यातल्या वाहतुकीची समस्या कमी करण्यास फायदा होईल. पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नव्या योजनांवर काम सुरू आहे. सातारा रोडवर एलिव्हेटेट रोड बांधण्याची योजना आहे. खाली रस्ता, त्यावर दोन उड्डाणपू आणि त्यावर मेट्रो याससारखी मास रॅपिड ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल त्यासंदर्भात मी अभ्यास करायला सांगितलं आहे असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले नितीन गडकरी हवेतल्या बसबाबत?

आम्ही १६५ रोप वे केबल कार बांधतो आहोत. आमच्याकडे हवेत उडणारी एक बस आहे. त्या बसमध्ये १५० लोक बसतात आणि ती वरच्यावर जाते. ती डॉफल मेअरची आहे. त्यासाठी आमच्याकडे पैसे आहेत. वरच्यावरून वाहतूक झाली तर त्याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे ट्रॉली बसचा पर्यायही वापरता येऊ शकतो. ज्यात दोन बस एकमेकींना जोडल्या जातात आणि ती बस इलेक्ट्रिक केबलवर चालते. इलेक्ट्रिक बसची किंमत सव्वा कोटी रूपये आहे. तेवढ्याच क्षमतेच्या ट्रॉली बसची किंमत ६० लाख रूपये आहे. त्यामुळे भांडवल गुंतवणूक कमी आहे. पुणे महापालिकेने अशी काही योजना तयार केली तर आम्ही त्यासाठी निधी देऊ शकतो असंही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in