'छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड करू नका'; संभाजीराजेंनंतर जयंत पाटलांचा इशारा

छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवकालीन इतिहासावर आधारित चित्रपटांवरून छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही उडी घेतलीये...
jayant patil reaction on 'har har mahadev', 'vedat marathe veer daudale saat' Movies
jayant patil reaction on 'har har mahadev', 'vedat marathe veer daudale saat' Movies

छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि त्यांच्याशी संबंधित इतिहासावरील सिनेमांची मालिकाच गेल्या काही वर्षांपासून बघायला मिळत असून, सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची तोडमोड केली जात असल्याचा मुद्दा छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केलाय. हा मुद्दा आता तापला असून, राष्ट्रवादी काँग्रेसनंही यावरून इशारा दिलाय.

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'हर हर महादेव' चित्रपटासह आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटांची नावं घेत छत्रपती संभाजीराजे यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना इशारा दिलाय. 'सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड केली जाते आणि सिनेमात सादर केलं जातं. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिनेमांबाबत आणि मावळ्यांबाबत आम्ही हे मुळीच सहन करणार नाही', असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी इशारा दिला.

छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांवरील चित्रपटांचा मुद्दा उपस्थित केला असून, याचे पडसाद उमटू लागले आहेत. छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समर्थन दिलं. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या भूमिकेला पाठिंबा देत इशारा दिलाय.

jayant patil reaction on 'har har mahadev', 'vedat marathe veer daudale saat' Movies
"अजिबात सहन करणार नाही",'हर हर महादेव', 'वेडात मराठे वीर दौडले सात'वरून छत्रपती संभाजीराजे भडकले

छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट वादात : जयंत पाटील काय म्हणाले?

छत्रपती संभाजीराजे यांनी मांडलेल्या भूमिकेचं समर्थन करताना जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हणणं मांडलं आहे. जयंत पाटील म्हणाले,'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायमच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभा असलेला पक्ष आहे. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी मोडतोड कदापि सहन केली जाऊ शकत नाही.'

'चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट तयार करताना छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित पुरावे उपलब्ध असलेली तथ्ये जशीच्या तशी दाखवावीत. कुठेही इतिहासाशी छेडछाड करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित तथ्यांची मोडतोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही', असा इशारा जयंत पाटील यांनी दिलाय.

jayant patil reaction on 'har har mahadev', 'vedat marathe veer daudale saat' Movies
'वेडात मराठे वीर दौडले सात', प्रवीण तरडे ते हार्दिक जोशी... पहा कोण कोणत्या भूमिकेत?

शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास मांडण्याची परंपरा पुरंदरेंनी सुरू केली -जितेंद्र आव्हाड

याच मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलंय की, 'महाराष्ट्रात शिवाजी महराजांचा चुकीचा, खोटा, इतिहास मांडण्याची परंपरा पुरंदरे ह्यानी सुरु केली. जाणता राजा हे महानाट्य हे त्याचं एक रुप, कारण त्यांचं लिखित पुस्तक होतंच तीच परंपरा आता चित्रपटसृष्टीत काही जण करत आहेत. आम्ही विरोध करुच, पण संभाजीराजे ह्यांच्या रुपाने एक आवाज मिळाला', अशी भूमिका मांडताना जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केलीये.

छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटांचा वाद : अमोल मिटकरींचीही टीका

आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हटलं आहे, 'खासदार युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाच्या मोडतोड केल्याप्रकरणी घेतलेली रोखठोक भूमिका त्याचे मी शंभर टक्के स्वागत व समर्थन करतो. इतिहासाची मोडतोड शिवप्रेमी म्हणून आम्ही खपवून घेणार नाही', अशी भूमिका मिटकरींनी मांडलीये.

'वेडात मराठे वीर दौडले सात', 'हर हर महादेव' या चित्रपटांच्या पटकथा आणि पात्राच्या वेशभूषेवरच छत्रपती संभाजीराजे यांनी प्रश्न उपस्थित केलेत. 'हर हर महादेव' सिनेमात चुकीचा इतिहास दाखवला गेला आहे. 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमात जे मावळे आणि छत्रपतींचे मावळे दाखवले, ते काय मावळे आहेत का? पोस्टरवरून ते मावळे वाटतात का?', असे प्रश्न छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केले असून, हा मुद्दा आता महाराष्ट्रात चिघळण्याची शक्यता दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in