BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे लावणार ताकद; 8 जणांवर नवी जबाबदारी
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू असून, आता शिंदे गटानंही मुंबई महापालिकेवर लक्ष्य केंद्रीत केलंय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी आठ जणांच्या नियुक्त्या केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसाठी पाच विभागप्रमुख, आणि तीन विभाग संघटकांची नियुक्ती केली असून, त्यांच्यावर पक्ष बांधणीची जबाबदारी सोपवण्यात आली […]
ADVERTISEMENT

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू असून, आता शिंदे गटानंही मुंबई महापालिकेवर लक्ष्य केंद्रीत केलंय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी आठ जणांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसाठी पाच विभागप्रमुख, आणि तीन विभाग संघटकांची नियुक्ती केली असून, त्यांच्यावर पक्ष बांधणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे निवडणूक लांबण्याची शक्यता असताना दुसरीकडे राजकीय पक्षांनी शिवसेनेसह इतर राजकीय पक्षांनी निवडणुकीत (BMC Election) यश मिळवण्यासाठी रणनीतीवर काम सुरू केलं आहे.
मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात आलाय. तर शिवसेनेकडून महापालिकेतील सत्ता पुन्हा राखण्याचे प्रयत्न होताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीत शिंदे गट लढणार असून, निवडणुकीच्या अनुषंगानं नियुक्त्या केल्या जात आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली शिंदे गटाची बैठक
शिंदे गटाचे सचिव, पदाधिकारी आणि आमदार यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात एक बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसाठी नव्या नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला.
मुंबई महापालिका निवडणूक : एकनाथ शिंदेंनी कुणाच्या नियुक्त्या केल्या?
दादर-माहीम वडाळा या विभाग क्रमांक 10 मधून गिरीश धानुरकर यांची विभागप्रमुखपदी, तर प्रिया गुरव यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भांडुप विक्रोळी, मुलुंड या विभाग क्रमांक 7 मधून माजी आमदार अशोक पाटील यांची विभागप्रमुखपदी, तर राजश्री मांदविलकर यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
चेंबूर, सायन, अणुशक्ती नगर विभाग क्रमांक 9 मधून अविनाश राणे यांची विभागप्रमुखपदी, तर कला शिंदे यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या विभाग क्रमांक 12 मधून दिलीप नाईक यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विभाग क्रमांक 6 मध्ये माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई महापालिका निवडणूक २०२२ : एकनाथ शिंदेंकडून आतापर्यंत कुणाच्या नियुक्त्या करण्यात आल्या?
यापूर्वी आमदार प्रकाश सुर्वे यांची दहिसर, बोरिवली, मागाठाणे या विभाग क्रमांक 1 या विधानसभेच्या विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आमदार दिलीप लांडे यांची घाटकोपर-चांदीवली-असल्फा विधानसभा मतदारसंघाच्या विभागप्रमुखपदी, तसेच माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची विभाग क्रमांक 11 म्हणजेच भायखळा विधानसभा मतदारसंघात विभागप्रमुखपदी नियुक्ती एकनाथ शिंदेंनी केली आहे.