महाविकास आघाडीच्या 'महामोर्चा'ला 13 अटींसह परवानगी, काय म्हटलंय आदेशात?

maha vikas aghadi morcha : मुंबई पोलिसांनी महाविकास आघाडीच्या मोर्चाला दिली सशर्त परवानगी
Mumbai police gives permission to maha vikas aghadi maha morcha
Mumbai police gives permission to maha vikas aghadi maha morcha

भाजप नेत्यांकडून महापुरूषांबद्दल करण्यात आलेली विधान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद यासह विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडीने 17 डिसेंबर रोजी महामोर्चा आयोजित केला असून, मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात आलीये. मोर्चाला परवानगी देताना पोलिसांनी 13 अटी घातल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजपच्या नेत्यांनी केलेली विधानं आणि राज्यातील इतर मुद्दे अधोरेखित करत महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चा आयोजित केला आहे. 17 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता हा मोर्चा मुंबईतील रिचर्डसन्स क्रुडास मिल पासून निघणार असून, टाइम्स ऑफ इंडियापर्यंत जाणार आहे.

महाविकास आघाडी मोर्चा : मुंबई पोलिसांनी काय घातल्या आहेत अटी?

१) रिचर्डसन्स क्रुडास मिल ते टाइम्स ऑफ इंडिया आयोजित मोर्चा शांततेने काढावा.

२) मोर्चामध्ये कुणीही प्रक्षोभक अथवा कुणाच्याही भावना दुखावतील, असे वक्तव्य करणार नाही. कुणाच्याही भावना दुखावतील असे लिखाण असलेले बोर्ड सोबत घेणार नाही किंवा घोषणा देणार नाही.

३) मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारची शस्त्रे, लाठी, पुतळे वगैरे घेऊन जाण्यास मनाई आहे.

४) मोर्चामध्ये प्राण्यांचा करण्यात येऊ नये.

५) कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेस बाधा येणार नाही, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी.

६) कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्या कायदेशीर आदेशाचे पालन मोर्चामधील लोकांनी करावे.

७) मोर्चामध्ये फटाके वगैरे वाजवण्यास प्रतिबंध राहिल.

८) मोर्चामुळे वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची दक्षता आयोजकांनी घ्यावी.

९) मोर्चा दिलेल्या मार्गावरूनच नेण्यात यावा व कोणत्याही परिस्थितीत मार्ग बदलू नये.

१०) मोर्चा निघाल्यानंतर मार्गावर रेंगाळत ठेवू नये.

११) मोर्चामध्ये वापरण्यात येणारी वाहने ही सुस्थितीमध्ये असावीत. वाहन चालकाकडे उचित परवाना आहे, वाहन चालकाने मादक पदार्थांचे सेवन केलेले नाही, वाहन चालक पूर्ण वेळ वाहनासोबत राहिल या बाबींची खातरजमा व पूर्तता करण्याची जबाबदारी सर्वस्वी आयोजकांची राहील.

१२) मोर्चादरम्यान महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3) अन्वये प्रतिबंध घालण्यात आलेल्या बाबींचे पालन करावे.

१३) मोर्चादरम्यान अश्लील हावभाव, अंगविक्षेप करू नये अथवा पादचाऱ्यांना वाहन चालकांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये.

१४) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (3) अन्वये तत्कालीन कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती पाहून पदयात्रेचा परवाना रद्द करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत, याची नोंद घ्यावी.

सर्व अटीचे तंतोतंत पालन मोर्चामधील सर्वजण करतील याची जबाबदारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र राणे, शिवसेना दक्षिण विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ या व्यक्तींवर राहिल, असंही मुंबई पोलिसांनी आदेशात स्पष्टपणे म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in