मुंबई: मित्रांसोबत पार्टी, 15 वर्षांची तरुणी बिअर प्यायली... नंतर, थेट ICU मध्ये दाखल! नेमकं काय घडलं?
एका 15 वर्षांच्या मुलीला दारू प्यायला दिल्याच्या आरोपाखाली ओशिवारा पोलिसांनी लोखंडवाला येथील फेमस हॉप्स किचन अँड बारच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

15 वर्षांची तरुणी बिअर प्यायली...

नंतर, थेट ICU मध्ये दाखल!

मित्रांसोबतच्या पार्टीत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime: एका 15 वर्षांच्या मुलीला दारू प्यायला दिल्याच्या आरोपाखाली ओशिवारा पोलिसांनी लोखंडवाला येथील फेमस हॉप्स किचन अँड बारच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित तरुणी तिच्या मित्रांसोबत बारमध्ये गेली होती. त्यावेळी तिला इतकी दारू पाजण्यात आली की तिची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. यानंतर पीडितेला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
मुलीला वारंवार उलट्या आणि चक्कर..
पोलिसांच्या माहितीनुसार, मद्य परवान्याअंतर्गत चालणाऱ्या या बारमधील कर्मचाऱ्यांकडून तरुणीला दारू देण्यापूर्वी तिची ओळख किंवा वय पडताळण्यात आलं नाही. अल्पवयीन पीडिता 21 तिचा वर्षीय मित्र आणि दोन पुरुष मित्रांसोबत बारमध्ये गेली होती. दारू प्यायल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागलं आणि तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितलं की, मुलीला नशेची लक्षणे आढळून आल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यावेळी डॉक्टरांनी तिला वारंवार उलट्या आणि चक्कर येत असल्याचे सांगितलं.
अर्धा ग्लास बिअर प्यायल्यानंतर सॉफ्ट ड्रिंक...
पोलिसांच्या तपासादरम्यान, अल्पवयीन तरुणी गोरेगाव पूर्व येथील रहिवासी असून तिची 21 वर्षीय मैत्रीण एका जिममध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते आणि ती गोरेगाव पश्चिम येथे राहत असल्याचं समोर आलं. रात्री 9 वाजता त्यांनी पार्टी करण्याचं ठरवले आणि त्यांच्या दोन पुरुष मित्रांना बोलावलं असल्याचं दोन्ही मुलींनी जबाब दिला. त्यानंतर, ते चौघेही लोखंडवाला येथील हॉप्स किचन अँड बारमध्ये गेले. त्यांनी तिथे बिअर ऑर्डर केली. दरम्यान, 15 वर्षांच्या मुलीने अर्धा ग्लास बिअर प्यायल्यानंतर तिने सॉफ्ट ड्रिंक पिण्यास सुरूवात केली असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: जालन्यात रक्ताच्या थारोळ्यात आढळला तीन वर्षीय मुलीचा मृतदेह, भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याचा अंदाज
पोलिसांना माहिती दिली
डिनर झाल्यानंतर त्यांनी बिल भरलं आणि आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले. घरी परर असताना पीडित मुलीला ऑटो-रिक्षात चक्कर आली आणि तिला उलट्या होऊ लागल्या. काही वेळातच, तिची 21 वर्षांची मैत्रीणीची सुद्धा तब्येत बिघडली. त्यांच्या मित्रांनी त्यांना ताबडतोब कूपर रुग्णालयात नेलं आणि तिथे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर, पोलिसांना या प्रकरणाबाबत माहिती देण्यात आली. ओशिवारा पोलीस लगेच रुग्णालयात पोहोचले आणि डॉक्टर तसेच पीडितेच्या मित्रांशी बोलल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. यासंदर्भात तक्रारदार आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती मिळवण्यात आली.