जालन्यात रक्ताच्या थारोळ्यात आढळला तीन वर्षीय मुलीचा मृतदेह, भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याचा अंदाज
Jalna Crime : जालन्यात रक्ताच्या थारोळ्यात आढळला तीन वर्षीय मुलीचा मृतदेह, पोलिसांना वेगळाच संशय
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जालन्यात रक्ताच्या थारोळ्यात आढळला तीन वर्षीय मुलीचा मृतदेह

संपूर्ण परिसरात खळबळ, पोलिसांना वेगळाच संशय
Jalna Crime : जालना शहरात रविवारी (दि.20) सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. माऊली नगर परिसरात केवळ 3 वर्षीय परी दीपक गोस्वामी हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळवले, आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास काही स्थानिक नागरिकांना एका घराजवळ छोट्या मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसला. हे दृश्य पाहून नागरिकांनी तत्काळ तालुका जालना पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. काही मिनिटांतच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरात बंदोबस्त घालण्यात आला. तपास पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाल्याचा पोलिसांना अंदाज
प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, परी हिचा मृत्यू भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. घटनास्थळाजवळ रक्ताचे डाग आणि कुत्र्यांच्या पावलांचे ठसे आढळले आहेत. मात्र, मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी आणि मृतदेह पोस्टमॉर्टेम करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतरच हल्ला नेमका कुत्र्यांनी केला की इतर काही कारण आहे, हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, परीच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. लहान वयात अशा प्रकारे जीव गमावल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या घटनेनंतर जालना पालिकेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. नागरिकांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करून भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.