
Narayan rane on Disha Salian Death Case : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर दिशा सालियनवर अत्याचार आणि हत्येचा आरोप केला आहे. इतकंच नाही, तर तुरुंगात पाठवणार असा गर्भित इशाराही राणेंनी दिलाय.
दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आलंय. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनचा 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणात वेगवेगळे आरोप करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे यांच्यापाठोपाठ शिंदे गटातील राहुल शेवाळे, भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरेंचा यांच्याशी संबंध असल्याचा दावा केलाय.
दिशा सालियन मृत्यू प्रकरण हिवाळी अधिवेशनातही प्रचंड गाजलं. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केलीये. एसआयटी चौकशीचा निर्णय राजकीय असल्याची म्हटलं जात असतानाच आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंना दिशा सालियनच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलंय.
रविवारी एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आदित्य ठाकरेंना उद्देशून म्हणाले, 'दिशा सालियनवर तू अत्याचार केला. तिची हत्या केली, तुला सोडणार नाही.'
'सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियनचं नाव आलं की आदित्य ठाकरे चवताळले. आज नाहीतर उद्या… पण तुला तुरुंगात नक्की पाठवणार. दिशा सालियन या एका भारतीय आणि महाराष्ट्रीयन मुलीवर तू अत्याचार केला आहे. तू हत्या केली आहे,' असा आरोप राणेंनी केलाय.
'त्यावेळी आदित्य ठाकरे तिथं उपस्थित होते. तुला सोडणार नाही. आता भाजपा आणि शिंदे गटाची सत्ता आहे, एवढं लक्षात ठेवा,' असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.