Pune Crime: पुणे हादरलं, जळालेले तीन मृतदेह, एक महिला आणि दोन मुलं..
खंडाळे गावाजवळ मुख्य रस्त्यालगत असलेल्या लक्ष्मी मंदिरामागे ग्रोव्हेल या खासगी कंपनीच्या कर्मचार्यांना पावसात मृतदेह आढळले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्यातील शिरूरमध्ये धक्कादायक घटना

जळालेल्या अवस्थेत आढळले तीन मृतदेह
Pune Crime News: पुणे: शिरूर तालुक्यातील खंडाळे गावाजवळ एक भयावह घटना घडली आहे. या गावाजवळ असलेल्या लक्ष्मी मंदिरामागे एका महिलेसह तिच्या दोन लहान मुलांचे मृतदेह आढळल्यानं पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्यात आले असून, ओळख पटवणंही कठीण झालं आहे. या तिहेरी हत्याकांडामागील कारण अस्पष्ट असून, हत्या का झाली याचा तपास पोलीस करत आहेत.
खासगी कंपनीच्या कर्मचार्यांनी पाहिले मृतदेह
हे ही वाचा >> रात्रीच्या वेळी घराबाहेर काढलं, मारून टाकण्याच्या, अत्याचाराच्या धमक्या दिल्या... परिणय फुकेंच्या भावजयीचे आरोप
खंडाळे गावाजवळ मुख्य रस्त्यालगत असलेल्या लक्ष्मी मंदिरामागे ग्रोव्हेल या खासगी कंपनीच्या कर्मचार्यांना पावसात मृतदेह आढळले. मृतांमध्ये 20 ते 25 वयाची एक महिला, चार वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षांचे बाळ यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह जाळण्यासाठी पेट्रोलचा वापर करण्यात आला होता, त्यामुळे ओळख पटवणं कठीण झालं आहे.
महिलेच्या हातावरील टॅटू ठरला महत्त्वाचा पुरावा
मृतदेह पूर्णपणे जळाले असले, तरी मृत महिलेच्या उजव्या हातावर आढळलेल्या टॅटूवरुन पोलिसांनी तपास सुरू केलाय. ही बाब पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरली आहे. मात्र, याशिवाय अन्य कोणताही ठोस पुरावा घटनास्थळी सापडलेला नाही.
हे ही वाचा >> गर्लफ्रेंडला भेटायला गेला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला...संभाजीनगर एन्काऊंटर प्रकरणात काय घडलं?
दरम्यान, या प्रकरणी पोलीस पाटील सीमा पंडित यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक उपनिरीक्षक गुलाब येले, पोलिस कॉन्स्टेबल तेजस रासकर, हेमंत इनामे, केशव कोरडे आणि उमेश कुटवळ यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वान पथकाची मदत घेण्यात आली, परंतु अतिरिक्त पुरावे सापडले नाहीत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.