पुणे हादरलं, पाकिस्तानी ब्यूटी क्रीम चक्क पुणेकरांच्या हाती आली अन्...
पुण्यातील पिंपरी परिसरातील कॉस्मेटिक्स दुकानात ‘Made in Pakistan’ असे नमूद असलेल्या गोरी ब्यूटी क्रीमची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ATB ने कारवाई करून 23 क्रीम जप्त केल्या आहेत.
ADVERTISEMENT

श्रीकृष्ण पांचाल, पुणे: पाकिस्तानमध्ये निर्मित झाल्याचे पॅकेजिंगवर नमूद असलेल्या कॉस्मेटिक क्रीमची पुण्यात विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या दहशतवादविरोधी शाखेने (ATB) पिंपरी परिसरातील एका कॉस्मेटिक्स दुकानावर कारवाई करत ‘गोरी ब्यूटी क्रीम’चे 23 नग जप्त केले आहेत. जप्त केलेल्या क्रीमची एकूण किंमत सुमारे 12 हजार 650 रुपये असल्याची माहिती आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
पिंपरीतील रिव्हर रोड परिसरात असलेल्या शक्ती कॉस्मेटिक्स या दुकानात पाकिस्तान निर्मित असल्याचे नमूद असलेली ‘गोरी ब्यूटी क्रीम’ विकली जात असल्याची माहिती ATB पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ATBच्या पथकाने पिंपरी पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने संबंधित दुकानावर छापा टाकला.
कारवाईदरम्यान पोलिसांना दुकानात ‘Made in Pakistan’ असे स्पष्टपणे नमूद असलेल्या ‘गोरी ब्यूटी क्रीम’चे 23 नग आढळून आले. पोलिसांनी हा साठा ताब्यात घेतला आहे.
23 क्रीमची किंमत 12,650 रुपये
पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या प्रत्येक क्रीमची किंमत सुमारे 550 रुपये आहे. त्यानुसार 23 क्रीमची एकूण किंमत सुमारे 12,650 रुपये होते. या प्रकरणात पोलिसांनी प्रकाश मनोहरलाल गुरु यांना आरोपी केले आहे.
