Pune: दीनानाथ रुग्णालयात 'त्या' दिवशी नेमकं घडलं तरी काय?, तनिषा भिसेंची संपूर्ण कहाणी जशीच्या तशी...
Dinanath Hospital incident: पुण्यातील दीनानाथ रुग्णलयाने केवळ पैशांसाठी योग्य वेळेत गर्भवती महिलेवर उपचार न केल्याने त्या महिलेला जीव गमवावा लागला. यावरून आता बरेच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. जाणून घ्या या दिवशी नेमंक काय घडलं होतं.
ADVERTISEMENT

पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेच्या मृत्यूच्या घटनेने संपूर्ण राज्यभरात खळबळ माजवली आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप होत आहेत. या प्रकरणाने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, घटनेच्या दिवशी दीनानाथ रुग्णालयात नेमकं काय घडलं यावर आपण एक नजर टाकूया.
घटनेची पार्श्वभूमी
तनिषा भिसे या 29 वर्षीय गर्भवती महिला प्रसूतीसाठी पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. तनिषा या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दिवशी सकाळी 9 वाजता तनिषा यांना रुग्णालयात आणण्यात आले. त्या जुळ्या मुलांची आई होणार होत्या, आणि त्यांची प्रकृती गंभीर होती. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, येथूनच वादाला सुरुवात झाली.
हे ही वाचा>> Mangeshkar Hospital: कोण होत्या तनिषा भिसे? पहिलंच बाळंतपण, दोन चिमुकलींना जन्म दिला अन्...
रुग्णालय प्रशासनाने तनिषा यांच्या उपचारांसाठी तब्बल 10 ते 20 लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले आणि तातडीने 10 लाख रुपये जमा करण्याची अट घातली. कुटुंबीयांनी अडीच ते तीन लाख रुपये तातडीने जमा करण्याची तयारी दर्शवली, परंतु रुग्णालयाने पूर्ण रक्कम जमा होईपर्यंत दाखल करून घेण्यास नकार दिला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यामुळे तनिषा यांना उपचार न मिळता रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले.
काय घडले पुढे?
कुटुंबीयांनी तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयाने ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता, परंतु तिथूनही योग्य उपचार मिळाले नाही. अखेरीस, सायंकाळी 5:30 वाजता तनिषा यांना वाकड येथील सूर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे सिझेरियनद्वारे त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, दुर्दैवाने, प्रसूतीनंतर तनिषा यांना अतिरक्तस्राव झाला आणि त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या नवजात मुली आयसीयूमध्ये दाखल आहेत.
