वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्टसाठी कंपनीकडे पैसे मागितले गेले?; राज ठाकरे काय म्हणाले?

वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातल्या गेल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केलाय...
Raj thackeray Reaction Vedanta Foxconn project
Raj thackeray Reaction Vedanta Foxconn project

महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातला गेला. यावरून वेगवेगळ्या स्वरुपाच्या टीका होताना दिसत आहे. या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी काही प्रश्न उपस्थित करत भूमिका मांडलीये.

वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातल्या गेल्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचं लक्ष नाहीये. ज्या प्रकारे महाराष्ट्राने औद्योगिक गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. तसं दिलं जात नाहीये. सुरूवातीपासून आपल्याकडे उद्योग-व्यवसाय आल्यानं आपल्या राजकर्त्यांना असं वाटतं की गेला तर काय फरक पडतो.'

वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट : फिस्कटलं कुठे आणि कशामुळे?

फॉक्सकॉन प्रोजेक्टबद्दल राज ठाकरेंनी काही प्रश्न उपस्थित केलेय. 'मी त्या दिवशी निवेदन जारी केलं होतं. त्यात मी मुळात हेच म्हटलं होतं की, हे फिस्कटलं कुठे आणि कशामुळे? याची चौकशी होणं गरजेचं आहे. या सगळ्या उद्योगाकडे काही पैसे मागितले गेले का?', असे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलेत.

'मलाही आजही आठवतंय की, या देशातील प्रत्येक राज्य मोठं व्हावं. प्रत्येक राज्यात उद्योगधंदे यावेत. २०१४ मध्ये मी सतत सांगत होतो की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या तीन राज्यांवर जास्तीत जास्त लक्ष द्यावं. या राज्यातून बाहेर पडणारी लोक त्याच राज्यात कामं शोधतील. प्रत्येक राज्यात उद्योगधंदे यायला हवेतच, पण महाराष्ट्रात आलेला उद्योग बाहेर का जातो, याची चौकशी होणं गरजेचं आहे', असं राज ठाकरे म्हणाले.

बीएमडब्ल्यूचा प्रोजेक्ट आणि विलासराव देशमुखांचं सरकार

राज ठाकरेंनी जुना अनुभवही शेअर केला. 'उद्योग बाहेर जाण्याला राज्यातील अस्थिर राजकारण याला शंभर टक्के जबाबदार आहे. १९९९ ते २००४ दरम्यानच गोष्ट मला आठवतेय. बीएमडब्ल्यूचा एक प्रोजेक्ट महाराष्ट्रात आला होता. त्यांची लोकं आली होती. विलासराव देशमुखांचं सरकार त्यावेळी होतं.'

'ती लोक आली, मंत्रालयात बैठक ठरली. काही तातडीच्या कामासाठी विलासरावांना जायचं होतं. त्यांच्या त्या अधिकाऱ्यांना आणि मुख्य सचिवांना त्यांनी बैठकीला हजर राहण्यास सांगितलं. ते बैठकीला गेले. ते अधिकारी दाक्षिणात्य होते. कोणतेही उद्योग येतात त्यांना वीज, पाणी यासारख्या मुलभूत सुविधा लागतात. त्यांनी त्या समोर ठेवल्या आणि अधिकार ना चा पाढा सुरु केला. नकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि बीएमडब्ल्यूचे अधिकारी एकमेकांकडे बघून निघून गेले', असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, 'ते निघाल्यानंतर दाक्षिणात्य अधिकाऱ्याने त्याच्या तामिळनाडूतील सहकाऱ्यांना फोन केला आणि त्यांच्याशी संपर्क करायला सांगितलं. त्यांनी बीएमडब्ल्यूच्या लोकांशी संपर्क केला आणि महाराष्ट्रात येणारा बीएमडब्ल्यूचा कारखाना तामिळनाडूत गेला. आताची परिस्थिती अशी असेल की, आपलं येणाऱ्या उद्योगांवर लक्ष नसेल आणि आपण उद्योगांकडे पैसे मागत असू, तर कोण येईल आणि का येईल? महाराष्ट्र मोठं होण्याचं कारणच ते होतं. मूळात जेवढे उद्योग भारतात येऊ इच्छितात, त्यांचा पहिला चॉईस महाराष्ट्र असतो. मग एव्हढं भाग्य महाराष्ट्राचं असेल, तर आपण हे उद्योग घालवतोय. त्यांनी चांगली ऑफर दिली असेल, तर गेला असेल', अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in