
नागपूरमध्ये सुरू असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचं भाषण मध्येच थांबवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कार्यक्रमात राहीबाई पोपेरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेटीदरम्यान घडलेल्या किस्सा सांगत अप्रत्यक्षपणे केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यामुळेच राहीबाई पोपेरे यांचं भाषण थांबवण्यात आल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू झाली.
महाराष्ट्रासह देशभर बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचं नागपूरमध्ये सुरू असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये भाषण आयोजित करण्यात आलं होतं. शेतकरी विज्ञान काँग्रेसवर त्यांचं भाषण होतं. यावेळी राहीबाई पोपेरे यांनी गावापर्यंत विकास पोहोचला नसल्याची खंत व्यक्त केली.
भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये बोलताना राहीबाई पोपेरे म्हणाल्या, "पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर मी उभे होते. तिथे नरेंद्र मोदी आले. ते मला म्हणाले, काय सीड्स मदर, 'बीजमाता, तुमचं काम कसं सुरू आहे?' मी त्यांना म्हणाले की, बरं चालूये. तुम्ही भेटायला येणार होता ना? ते म्हणाले, 'कोरोनाने येऊ दिलं नाही.' मी त्यांना म्हणाले की, आता संपलाय कोरोना. आम्ही इथंपर्यंत आलोय. तुम्हाला काय अडचण आहे?"
"मोदी मला म्हणाले, 'येऊ कधीतरी. त्यांनी कौतुक केलं." यावेळी आपण मोदींना अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळने गावात अद्याप विकास पोहोचला नसल्याचं सांगितल्याचंही राहीबाई पोपेरे यांनी यावेळी सांगितलं.
"अजून माझ्या गावाला रस्ताही नाही. उन्हाळ्यात प्यायला पाणी नसतं. खूप लोक येतात. माझ्या घराच्या उद्घाटनाला चंद्रकांत पाटील येणार होते."
"मी त्यांना म्हणाले, 'महिला वरून जाताना विमान बघतात. उद्घाटनाला यायचं असेल, तर इथेच हेलिकॉप्टर उतरवा. त्यांनी तिथंच हेलिकॉप्टर उतरवलं", असं राहीबाई म्हणाल्या. त्यानंतर भारतीय सायन्स काँग्रेसच्या समन्वयक आणि भाजपच्या माजी नगरसेविका कल्पना पांडे या राहीबाई पोपेरे यांच्याजवळ आल्या.
त्यांनी राहीबाई पोपेरे यांचा माईक बंद केला आणि त्यानंतर त्यांना भाषण संपवायला सांगितलं. त्यानंतर राहीबाई पोपेरे यांनी भाषण थांबवलं. राहीबाई पोपेरे यांना भाषण आवरतं घ्यायला लावल्याची बाब उपस्थितांच्या निदर्शनास आली. त्यानंतर राहीबाई पोपेरे यांनी गावापर्यंत विकास पोहोचला नसल्याच्या मुद्द्यावरून अप्रत्यक्षपणे टीका केल्यानं हा प्रकार घडल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू झाली. दरम्यान यासंदर्भात कल्पना पांडे यांच्याशी मुंबई Tak ने संपर्क केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद दिला नाही.