आमच्याच लोकांचं रक्त सांडवायचं नाही, आम्ही मार्ग काढू; संजय राऊत नाशिकमध्ये काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शहरातील असो की जिल्ह्यातील शिवसेना जागेवरच आहे. एक-दोन लोक पळून गेले असतील, त्यांच्याबरोबर शिवसेना गेलेली नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मला इथे येऊन पाहण्याची अजिबात गरज नव्हती. तरी मला पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी वाटली. मी कालपासून आलोय असंही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं. मालेगाव, नांदगाव या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी मला भेटून गेले आहेत. उद्या परत भेटणार आहेत. उद्या काही नवीन लोक शिवसेनेशी जोडले जाणार आहेत.

नाशिक राजकीयदृष्ट्या चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. नाशिक शहर, महापालिका आणि जिल्हा नेहमीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहिलेला आहे. सगळे माजी नगरसेवक मला भेटले. महापालिकेची तयारी सुरूये. कधीही निवडणुका झाल्या तरी महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता येईल. तिकडे काय घडतंय, यांच्याशी नाशिकचा संबंध नाही,” असं राऊत म्हणाले.

“हा जो धुरळा उडाला आहे, ते कृत्रिम वादळ आहे. ती वावटळ आहे, ती दूर होईल आणि शिवसेना पुन्हा जोमाने कामाला लागली आहे. ती पुढे गेलेली दिसेल,” असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिवसेनेच्या नव्या निवडणूक चिन्हाबद्दल बोललं जात आहे, यावर राऊत म्हणाले, “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यासंदर्भात मातोश्रीवर पत्रकार परिषद घेणार आहेत. तिथे ते बोलणार आहेत. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचं आहे आणि शिवसेनेचंच राहिल.”

शिवसेना संजय राऊतांमुळे संपत चाललीये, असा आरोप बंडखोर आमदारांकडून केला जातोय. यावर राऊत म्हणाले, “भाजपने माझ्यावरच बोलणं थांबवलं आहे. त्यांना नवीन ४० भोंगे मिळाले आहेत. त्यांच्या माध्यमातून ते बोलत आहेत. त्यांना बोलू द्या. इतके वर्ष आम्ही सोबत काम केलंय. आजही त्यांना आमचे सहकारी मानतो. नाशिकच्या लोकांना उद्धव ठाकरेंना सांगून उमेदवाऱ्या द्यायला लावल्या.”

ADVERTISEMENT

“पहिल्या दिवशी पक्ष सोडण्याचं त्यांचं कारण वेगळं होतं. शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं. दुसऱ्या दिवशी म्हणाले, आम्हाला वर्षा बंगला आणि मंत्रालयात मुख्यमंत्री भेटत नाहीत. तिसरं कारण होतं राष्ट्रवादी निधी देत नाही. चौथं कारण वेगळंच निघालं. आता पाचवं कारणावर आलेले आहेत. त्यामुळे मी त्यांना सांगितलंय की, नेमकं कारण शोधा. चर्चा करा. यात कारण एकच आहे की, भाजपला शिवसेना फोडायची नाही, तर संपवायची आहे,” असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलं.

ADVERTISEMENT

“सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय, त्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना बहुमताचा ठराव राज्यपालांनी घ्यायला लावणं, हे बेकायदेशीर आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी आम्हाला तारीख दिली गेली नाही, पण हे सरकार येताच २४ तासांत तारीख दिली. राज्यपाल हे स्वतंत्र वृत्तीचे, घटनेचे पालन करणार नाहीत, हे सर्वांचं म्हणणं आहे. एकतर्फी पद्धतीने हे निर्णय घेतले आहेत,” असं राऊत म्हणाले.

आदित्य ठाकरेंवरील बंडखोर आमदारांच्या टीकेलाही राऊतांनी उत्तर दिलं. “जे आमदार गेले आहेत, त्यांची मुलं युवा सेनेमध्ये पदाधिकारी आहेत. अगदी दादा भुसे यांचा मुलगाही.”

“एकेकाळच्या शिवसैनिकांना बरे दिवस आले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष एकेकाळचे शिवसैनिक. सध्याचे मुख्यमंत्री एकेकाळचे शिवसैनिक होते. शिवसेनेबरोबर लढण्यासाठी त्यांना शिवसैनिकच हवे आहेत. आमच्यात फूट पाडायची. एकमेकांवर हल्ले करायला लावायचे. यात रक्तपात कुणाचा होणार तर शिवसैनिकांचा. दिल्लीच्या पाठिंब्याने भाजपचं हेच धोरण दिसतंय. त्यामुळे आम्ही सावधपणे पावलं टाकत आहोत. भाजपने कितीही प्रयत्न केले, तरी आम्हाला आमच्याच लोकांचं रक्त सांडवायचं नाही. आम्ही मार्ग काढू,” असं विधान राऊतांनी केलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT