बदलापूर : अय्यंगार बेकरीतील केकमध्ये उंदराची विष्ठा, दोन मुलींसह नगरसेविका आजारी
बदलापूर शहरातील अय्यंगार बेकरी पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या बेकरीतून खरेदी केलेल्या केकमध्ये उंदराची विष्ठा आढळून आल्याने कारवाईची मागणी केली जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
केकमध्ये उंदराची विष्ठा
दोन मुलींसह नगरसेविका आजारी
बदलापूरात अय्यंगार बेकरीविरोधात संताप
Iyengar Bakery News : बदलापूर शहरातील अय्यंगार बेकरी पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बेकरीच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बदलापूर पश्चिमेत बेलवली येथे असलेल्या या बेकरीतून नगरसेविका हर्षाली गायकवाड यांनी खरेदी केलेल्या केकमध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा केक नगरसेविका आणि त्यांच्या दोन मुलींनी खाल्ल्यानंतर तिघींनाही उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडल्याने दोन्ही मुलींना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
अय्यंगार बेकरीतील प्रकार
अय्यंगार बेकरीतील अस्वच्छता आणि निष्काळजीपणाची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही अनेक वादग्रस्त प्रकार समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वीच बदलापूर पूर्वेतील शाखेत खारीच्या ट्रेमध्ये उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. याशिवाय, सानेवाडी येथील शाखेतही अस्वच्छता असून ग्राहकांना 'व्हेज केक'च्या नावाखाली अंडी वापरून तयार केलेला केक विकून फसवणूक केली जात असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे बदलापूरकर ग्राहकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांत पावसाचा धुमाकूळ, IMD चा मोठा अलर्ट
प्रयोगशाळेत तपासणी सुरु
या घटनेनंतर बदलापुरात विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी संगीता चेंदवणकर यांनी संबंधित दुकानात थेट जाऊन निषेध नोंदवला. दरम्यान, नगरसेविका हर्षाली गायकवाड यांनी याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तक्रार दाखल केल्यानंतर ठाणे एफडीएच्या पथकाने तातडीने बेकरीवर धाड टाकली. अधिकाऱ्यांनी बेकरीतील विविध अन्नपदार्थांचे नमुने जप्त केले असून त्यांची प्रयोगशाळेत तपासणी सुरू केली आहे.
हे ही वाचा : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का? अंकशास्रज्ञाची 'ती' शक्यती
बेकरीच्या सर्व शाखांवर कारवाईची मागणी
नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अय्यंगार बेकरीच्या सर्व शाखांवर प्रशासनाने त्वरित कठोर कारवाई करून त्या पूर्णपणे बंद कराव्यात, अशी ठाम मागणी नगरसेविका हर्षाली गायकवाड यांनी केली आहे. प्रशासनाने याप्रकरणी कडक पावले उचलली नाहीत, तर येत्या काळात आंदोलन उभारले जाईल आणि दुकानांची तोडफोड करण्यात येईल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. आता याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन काय कारवाई करते, याकडे संपूर्ण बदलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
