दुर्गापूजा सुरु असताना मंडपाचा एक भाग कोसळला, चेंगराचेंगरीत 19 जणांचा मृत्यू; 25 जण जखमी
Kolkata Durga Puja Pandal Collapse Stampede : कोलकात्यातील चोरबागान दुर्गापूजा मंडपाचा एक भाग कोसळल्यामुळे आणि पावसामुळे लोकांची धावपळ सुरु झाली. त्यामुळे त्याठिकाणी मोठी चेंगराचेंगरी झाली. दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दुर्गापूजा सुरु असताना मंडपाचा एक भाग कोसळला
चेंगराचेंगरीत 19 जणांचा मृत्यू; 25 जण जखमी
Kolkata Durga Puja Pandal Collapse Stampede : कोलकात्यातील चोरबागान येथे दुर्गापूजा सुरु असताना मंडपात गर्दी आणि पावसामुळे लोकांची मोठा धावपळ झाली. त्यामुळे मोठी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आलीये. मंडपातील एका भागाचा कोसळल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आठच्या दरम्यान ही घटना घडली. जखमींपैकी एक किंवा दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी दिली.
पाऊस आणि मोठ्या गर्दीमुळे शारदा पार्क पूजा मंडपाच्या बाहेर पडण्याच्या प्रवेशद्वाराजवळ चेंगराचेंगरी झाल्याची माहिती कोलकाता पोलिसांनी दिली. घटनेनंतर चोरबागान पूजा समितीच्या सरचिटणीसांसह पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.
हेही वाचा : सिंधुदुर्ग : बसमधून उतरली पण घरी पोहोचलीच नाही, नदीत सापडला मृतदेह, नंदिनीसोबत काय घडलं?
दुर्घटनेनंतर बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढून कलकत्ता मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पूजा आयोजकांनीही मदत आणि बचावकार्य सुरु केलंय. मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी आणि मुख्य सचिव मनोज अग्रवाल यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली.
दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात येणार
प्राथमिक माहितीनुसार, मंडळाकडून ध्वनिक्षेपकावर करण्यात आलेल्या घोषणेनंतर चेंगराचेंगरी किंवा गुदमरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. पूजा समितीचे सदस्य आणि सुरक्षेशी संबंधित व्यक्तींची चौकशी करण्याचे, तसेच सीसीटीव्ही चित्रण सुरक्षित ठेवण्याचे निर्देश कोलकाता पोलिसांना देण्यात आले आहेत. विशेष कृती दल, न्यायवैद्यक पथक आणि अग्निशमन दलाकडूनही तपास सुरू आहे.
हेही वाचा : ज्ञानेश कुमारांचा बचाव कोण करतंय? CJP च्या आंदोलनातून कोणते सवाल?
या दुर्घटनेनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल रवी यांनी दुःख व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली. अमित शाह यांनी मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यांनी पश्चिम बंगालमधील दुसऱ्या दिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केले असून जखमींची रुग्णालयात भेट घेणार असल्याचे सांगितले. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. सरकारने मदतीसाठी १८००३४५५६७८ हा टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. प्रत्यक्षदर्शींनी अनेक जण बेशुद्ध पडल्याचे आणि त्यांना दुचाकींवरून बाहेर नेण्यात आल्याचे सांगितले.
जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या जखमींवर उपचार करणे आणि गंभीर जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत मिळवून देणे हे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तातडीने व्यवस्था करण्याची मागणीही त्यांनी केली. तृणमूल काँग्रेसने या दुर्घटनेवरून पोलीस आणि प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळी पोलीस, नागरी स्वयंसेवक आणि रुग्णवाहिकांची पुरेशी व्यवस्था नव्हती, असा दावा पक्षाने केला. दरम्यान, प्रशासनाच्या निर्देशानुसार ताला प्रतॉय पूजा मंडप बंद करण्यात आला असून चेतला अग्रणी मंडपही एका तासासाठी बंद ठेवण्यात आला होता. चोरबागान मंडप भाविकांसाठी बंद करण्यात आला आहे.
