पीएफधारकांसाठी आनंदाची बातमी! आता ९० टक्के रक्कम काढता येणार, नोकरी गेल्यास फक्त २ महिन्यांत मिळणार पैसे

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. टप्प्याटप्प्याने पैसे काढण्याची सुविधा आणि बेरोजगारीच्या काळात लवकर रक्कम काढण्याच्या निर्णयामुळे सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ADVERTISEMENT

EPFO Eases PF Withdrawal Rules: Major Relief for Crores of Subscribers
EPFO Eases PF Withdrawal Rules: Major Relief for Crores of Subscribers
Google CTA

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात इपीएफओने (EPFO) पीएफ खात्यातून रक्कम काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने या निर्णयाला मान्यता दिली असून यामुळे देशभरातील कोट्यवधी इपीएफओ सदस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन नियमांमुळे पैसे काढणे अधिक सुलभ आणि सोईस्कर होणार आहे. 

नवीन नियमांनुसार, निवृत्त कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यातील सर्व निधी एकाच वेळी काढण्याऐवजी मासिक, तिमाही किंवा सहामाहीच्या अंतराने काढण्याची सुविधा देण्यात येणार आहे. अर्थात, ज्यांना सर्व निधी एकाच वेळी काढायचा आहे, त्यांच्यासाठी हा पर्याय देखील खुला असेल. विशेष म्हणजे, ठराविक अंतराने निधी काढण्याचा निर्णय घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना खात्यातील उर्वरित रकमेवर व्याज मिळत राहील.

किमान शिल्लक मर्यादेत कपात

इपीएफओकडून पीएफ खात्यात शिल्लक ठेवण्याच्या किमान रकमेच्या मर्यादेत देखील कपात करण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार, ५५ वर्षांआधी नोकरी सोडणाऱ्या किंवा निवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा पात्र सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यात केवळ १० टक्के रक्कम शिल्लक ठेवणं बंधनकारक असणार आहे. यापूर्वी ही मर्यादा २५ टक्क्यांपर्यंत होती. म्हणजेच आता एकूण निधीपैकी ९० टक्के रक्कम काढता येणार आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की कुठलाही कर्मचारी थेट ९० टक्के रक्कम काढू शकेल; रक्कम काढण्यासाठीच्या निर्धारित अटी आणि नियमांची पूर्तता केल्यानंतरच हे शक्य होईल.

हे ही वाचा>> WhatsApp वर 'Hi' लिहा अन् एक झटक्यात समोर येईल तुमचा PF बॅलन्स!

बेरोजगार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

नवीन नियमांचा सर्वाधिक फायदा कुठल्याही कारणास्तव नोकरी गेल्याने बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. नोकरी गेल्यानंतर पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी पूर्वी १२ महिने वाट बघावी लागत असे. आता मात्र केवळ २ महिन्यांनंतर ही रक्कम काढता येणार आहे. साहजिकच, संकटाच्या काळात कर्मचाऱ्यांना याचा मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

या कामांसाठी काढता येतील पैसे

उपचार: स्वतःच्या किंवा कुटुंबातील कुठल्याही सदस्याच्या वैद्यकीय उपचारांसाठी.

शिक्षण: स्वतःच्या किंवा कुटुंबातील कुठल्याही सदस्याच्या शिक्षणावरील खर्चासाठी.

लग्न: स्वतःच्या किंवा कुटुंबातील कुठल्याही सदस्याच्या लग्नसमारंभावरील खर्चासाठी.

घर खरेदी: घर किंवा फ्लॅट खरेदी, जमीन खरेदी किंवा गृहकर्जाचे हप्ते भरण्यासाठी.

इपीएफओच्या सदस्यांना वर नमूद केलेल्या कारणांव्यतिरिक्त इतरही काही कारणांसाठी पैसे काढण्याची मुभा असेल. अर्थात, त्यासाठी देखील ठराविक नियमांची पूर्तता करणं अनिवार्य असणार आहे.