कराडजवळ भीषण अपघात! महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या चार मित्रांचा मृत्यू, तिघे गंभीर

Karad Accident : कराडजवळ पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर स्कॉर्पिओची ट्रकला धडक बसून चार तरुणांचा मृत्यू झाला. तिघे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ADVERTISEMENT

Karad Accident
Karad Accident
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कराडजवळ भीषण अपघात

point

महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या चार मित्रांचा मृत्यू, तिघे गंभीर

Karad Accident : सातारा जिल्ह्यातील कराड शहराजवळ पुणे-बेंगळुरू महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चार तरुण मित्रांचा मृत्यू झाला असून, अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर येथील आई महालक्ष्मीचं दर्शन घेऊन स्कॉर्पिओ गाडीतून गावाकडे परतताना या तरुणांवर काळाने घाला घातला. कराडजवळ काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या नव्या सहापदरी उड्डाणपुलावर हा अपघात झाला. रात्री साधारण 11 वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडी ट्रकला मागून धडकली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीचा पूर्ण चुराडा झाला. या अपघातामुळे साताऱ्यातील खटाव तालुक्यात असलेल्या कातरखटाव गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : गोकुळमध्ये सतेज पाटील यांचा विजय, हर्षदा जाधव देशमुख काय म्हणाल्या?

उड्डाणपुलावरील हा पहिलाच अत्यंत भीषण अपघात

कातरखटाव गावातील काही तरुण दसऱ्यानिमित्त कोल्हापूर येथील आई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी स्कॉर्पिओ गाडीतून गेले होते. दर्शन घेतल्यानंतर सर्वजण रात्रीच्या सुमारास आपल्या गावाकडे परतत होते. यावेळी कराड शहराजवळ पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर त्यांच्या गाडीचा ट्रकला मागून धडकून भीषण अपघात झाला. अपघातात गाडीतील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. काही दिवसांपूर्वीच वाहतुकीस खुल्या करण्यात आलेल्या या नव्या उड्डाणपुलावरील हा पहिलाच अत्यंत भीषण अपघात ठरला आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather : हवामानाचा लपंडाव, कधी पाऊस, तर कधी कोरडं हवामान; IMD चा अलर्ट

परतीच्या प्रवासात चौघांचा जीव गेला 

या अपघातात तेजस देशमुख (वय 25 वर्षे), सागर निंबाळकर (वय 23 वर्षे), सुयश चिंचकर (वय 20 वर्षे) आणि रोहित धोत्रे (वय 21 वर्षे) यांचा मृत्यू झाला. तेजस देशमुख हा स्कॉर्पिओ गाडी चालवत होता. या दुर्घटनेत ऋतुराज दुबळे (वय 21 वर्षे), शंतनू शिंगाडे (वय 20 वर्षे) आणि अमन तांबोळी (वय 23 वर्षे) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दर्शनासाठी गेलेल्या तरुणांचा परतीच्या प्रवासात अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघाताची माहिती मिळताच कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, कराड वाहतूक शाखेचे संदीप साळुंखे, संग्राम पाटील, अमृत बाबर, दस्तगीर आगा, राहुल कदम आणि सचिन देवकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. पोलीस आणि नागरिकांनी मिळून जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या अपघातामुळे कातरखटाव गावातील चार कुटुंबांवर दुःखाचा प्रसंग ओढवला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.