गोकुळच्या निवडणुकीत मुलाचा पराभव, आता मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया
Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील पराभवानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पराभव ठरवून केल्याचा आरोप करत त्यांनी कार्यकर्त्यांना आत्मचिंतन आणि आगामी पदवीधर निवडणुकीच्या तयारीचं आवाहन केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गोकुळच्या निवडणुकीत मुलाचा पराभव
आता मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया
Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने महायुतीचा पराभव केल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा पराभव ठरवून करण्यात आल्याचा आरोप करत मुश्रीफ यांनी आता आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं म्हटलं. तसेच, पराभवामुळे खचून न जाता पुन्हा कामाला लागण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. यावेळी त्यांनी आगामी पदवीधर निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार स्मिताताई जाधव यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहनही केलं.
हेही वाचा : Maharashtra Weather : हवामानाचा लपंडाव, कधी पाऊस, तर कधी कोरडं हवामान; IMD चा अलर्ट
महायुतीला अपेक्षित यश मिळवता आलं नाही
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बाजी मारली. महायुतीकडून तीन मंत्री, दोन खासदार आणि अनेक आमदारांची ताकद लावण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. ठरावधारकांचं क्रॉस व्होटिंग, सतेज पाटील यांनी केलेला थेट संपर्क, सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजी आणि राजकीय नरेटिव्हची लढाई ही विजयामागची प्रमुख कारणं मानली जात आहेत. या निकालानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.
हेही वाचा : Personal Finance: सोनं न विकताही करता येईल कमाई, नेमकी कोणती आहे गुंतवणूक?
“माझा पराभव ठरवून केला”
या पराभवाबाबत बोलताना हसन मुश्रीफ यांनी, “ माझा पराभव ठरवून केला,” असं म्हटलं. मतदान केंद्रावरील आकडे पाहिल्यास हे लक्षात येईल, असा दावाही त्यांनी केला. अनेक वर्षांपासून ग्रामपंचायती, कारखाने, बँका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये मिळालेल्या विजयामागे कार्यकर्त्यांचा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलं. आता झालेल्या पराभवाचं आत्मपरीक्षण करून आवश्यक त्या दुरुस्त्या करायला हव्यात आणि पुन्हा एकदा आपली मान राखली पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं. गोकुळच्या निवडणुकीतील पराभवामुळे निराश न होता नव्या जोमाने कामाला लागण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीतील पराभवाबाबत आत्मचिंतन करण्यासाठी उद्या संध्याकाळी पाच वाजता कागल येथे उपस्थित राहण्याचं आवाहन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलं. यासोबतच 23 तारखेला होणाऱ्या पदवीधर निवडणुकीचाही त्यांनी उल्लेख केला. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना भैया माने यांनी नोंदणी झालेल्या मतदारांची सर्व मतं स्मिताताई जाधव यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिल्याचंही मुश्रीफ यांनी सांगितलं. गोकुळच्या निकालानंतर पुढील निवडणुकीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
