वेदर रिपोर्ट : प्रतिचक्रवात आणि घामाच्या धारा, उष्णतेचा अलर्ट कुठे?
Maharashtra october heat : महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा प्रभाव वाढला असून मुंबई, कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वेदर रिपोर्ट : प्रतिचक्रवात आणि घामाच्या धारा
उष्णतेचा अलर्ट कुठे?
Maharashtra october heat : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असून अनेक भागांमध्ये सरासरी तापमानापेक्षा दोन ते सात अंश सेल्सिअसने अधिक तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह विविध भागांत उष्णतेचा त्रास जाणवत आहे. पावसाने माघार घेतल्यानंतर राज्यात ढगांचे प्रमाण कमी झाले असून पावसासाठी पोषक वातावरणही सध्या दिसत नाही. त्यामुळे ऑक्टोबर हिटचा परिणाम आणखी दोन ते तीन दिवस जाणवण्याची शक्यता आहे. मंगळवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतही उन्हाचा त्रास जाणवण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा : वर्गमैत्रिणीच्या घरी गेला अन् गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, दहावीच्या विद्यार्थ्यासोबत काय घडलं?
या भागात सरासरीपेक्षा दोन ते सात अंश सेल्सिअसने तापमान वाढले
मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात कमाल तापमान 33 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या भागात सरासरीपेक्षा दोन ते सात अंश सेल्सिअसने तापमान वाढले आहे. मध्य महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक ते सोलापूरपर्यंतच्या दहा जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 34 ते 38 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून तापमानात दोन ते साडेचार अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये तापमान 34 ते 36.6 अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. तर विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 35 ते 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. विदर्भात तापमानात दोन ते 6.2 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांत नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.
तापमानात झालेल्या या वाढीमागे प्रतिचक्रवात हे प्रमुख कारण
तापमानात झालेल्या या वाढीमागे प्रतिचक्रवात हे प्रमुख कारण असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. प्रतिचक्रवातामुळे हवेचा दाब वाढतो आणि हवा वर जाण्याऐवजी खाली येते. या प्रक्रियेमुळे हवेतील आर्द्रता कमी होते आणि ढगांची निर्मिती होत नाही. परिणामी, सूर्यप्रकाश थेट जमिनीवर पडल्याने जमीन वेगाने तापते आणि तापमानात वाढ होते. ऑक्टोबर हा पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूंमधील संक्रमणाचा काळ असल्याने या महिन्यात ऑक्टोबर हिटचा अनुभव येतो. सध्या महाराष्ट्रावर ढगांचे आवरण दिसत नाही. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातही पावसासाठी पोषक वातावरण नसल्याचे सांगण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरातून आर्द्रतायुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने आल्यास तापमानात घट होऊ शकते. मात्र, सध्या तशी परिस्थिती दिसत नाही.
