सांगली : वरिष्ठ लिपिकाची महिला सहकाऱ्याकडे नको ती मागणी, एसटी विभागीय कार्यालयात काय घडलं?
एसटी महामंडळाच्या एका विभागीय कार्यालयात संतापजनक घटना घडली आहे. एका लिपिकाने सहकारी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. यानंतर पुढं काय घडलं, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सांगली : क्लर्कची महिला सहकाऱ्याकडे नको ती मागणी
एसटी विभागीय कार्यालयात काय घडलं?
Sangli News, स्वाती चिखलीकर : एसटी महामंडळाच्या सांगली विभागीय कार्यालयात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. आपल्याच कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन करून तिच्याकडे थेट शरीरसुखाची मागणी एका वरिष्ठ लिपिकाने केली होती. यामुळे संतापलेल्या पीडित महिलेच्या नातेवाईकांनी लिपिकाला कार्यालयातच चोप दिला. या घटनेमुळे एसटी विभागीय कार्यालय परिसरात काही काळ प्रचंड खळबळ उडाली होती. भर कार्यालयात घडलेल्या या मारहाणीच्या प्रकारामुळे इतर कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली, तसेच या घटनेची माहिती मिळताच कार्यालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
असभ्य वर्तन आणि शरीरसुखाची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वरिष्ठ लिपिक गेल्या काही दिवसांपासून कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याला सातत्याने मानसिक त्रास देत होता. कार्यालयात काम करत असताना तिच्याशी असभ्य वर्तन करून, त्याने पदाचा गैरवापर करत थेट शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. वरिष्ठ लिपिकाच्या या सततच्या त्रासाला कंटाळून आणि अत्यंत संतप्त झालेल्या महिला कर्मचाऱ्याने अखेर हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना सांगितला.
हे ही वाचा : Maharashtra Weather : वारं फिरलं, राज्याच्या दिशेनं घोंगावणार संकट, 23 जिल्ह्यांना मोठा अलर्ट
कार्यालयात घुसून मारहाण
महिला कर्मचाऱ्यासोबत घडलेला हा संतापजनक प्रकार ऐकून तिच्या नातेवाईकांचा राग अनावर झाला. त्यांनी थेट सांगलीतील एसटी विभागीय कार्यालयात धडक दिली. नातेवाईकांनी संबंधित वरिष्ठ लिपिकाला गाठून त्याच्या या कृत्याबाबत जाहीर जाब विचारला. यावेळी वरिष्ठ लिपिकाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे संतप्त नातेवाईकांचा संयम सुटला आणि त्यांनी सर्वांसमोर त्या लिपिकाला चांगलाच चोप दिला.
हे ही वाचा : Personal Finance: पोस्टाची कोणती स्कीम तुमच्यासाठी आहे जबरदस्त?
कारवाईकडे सर्वांचे लक्ष
या गंभीर प्रकरणानंतर आता संबंधित दोषी लिपिकावर कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा आणि लैंगिक छळाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळणे किती गरजेचे आहे, हे या घटनेवरून पुन्हा सिद्ध झाले असून या नराधमावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.









