चक्राकार वाऱ्यांमुळे मुसळधार पाऊस, जोर वाढणार; कुठे-कुठे येलो अलर्ट?

मुंबई तक

महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या परिसरातील चक्रीवादळसदृश हवेची स्थिती आणि संबंधित हवामान प्रणालींचा राज्यातील पावसावर परिणाम होत आहे. IMD चा अलर्ट नेमका काय आहे, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Weather Update
Weather Update
Google CTA

बातम्या हायलाइट

point

चक्राकार वाऱ्यांमुळे मुसळधार पाऊस

point

कुठे-कुठे येलो अलर्ट?

Weather Update : थायलंडजवळ अनेक दिवसांपासून ट्रॅक केले जाणारे कमी दाबाचे क्षेत्र आता पूर्णपणे तयार झाले असून, त्याचा मोठा परिणाम बंगालच्या उपसागरासह भारताच्या हवामानावर होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 19 सप्टेंबरपासून राजस्थानमधून परतीच्या पावसाला (मान्सून विड्रॉल) सुरुवात होत आहे. सध्या मान्सूनचा मुख्य द्रोणीय पट्टा (मान्सून ट्रफ) त्याच्या सामान्य स्थितीत आहे. अरबी समुद्रातून बाष्प खेचले जात असल्यामुळे राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, त्याचा थेट परिणाम आगामी काळात महाराष्ट्रातील हवामानावरही दिसून येणार आहे.

विदर्भात पावसाची शक्यता

महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्यांची (चक्रीय अभिसरण) स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीमुळे मराठवाडा, धुळे आणि नंदुरबारसह राज्यातील अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. याशिवाय, 21 ते 26 सप्टेंबर या कालावधीत बंगालच्या उपसागरात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असल्याने विदर्भातही चांगल्या पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या मते, परतीच्या प्रवासाला लागण्यापूर्वीची ही राज्यातील पावसाची शेवटची मोठी बॅच असू शकते.

हे ही वाचा : अमोल खुणे Vs गंगाधर काळकुटे : मनोज जरांगेंवरील कोट्यवधी रुपयांच्या टेंडरच्या आरोपांवर काय म्हणाले?

'या' ठिकाणी येलो अलर्ट

आगामी तीन दिवसांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी, 19 तारखेला नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे आणि साताऱ्याचा घाटमाथा, रायगड, रत्नागिरी, लातूर, नांदेड व हिंगोली या जिल्ह्यांना मध्यम ते मुसळधार पावसाचा आणि विजांच्या कडकडाटाचा 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. रविवारी पुणे, सातारा, नाशिकमधील घाट परिसर, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. यादरम्यान रविवारी विदर्भात कोणताही अलर्ट नसून मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

हे ही वाचा : Personal Finance: घराचा EMI तुमच्या Futureवर किती परिणाम करतो?

'या' जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार

सोमवारी विदर्भ वगळता राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड आणि सोलापूर या सर्व जिल्ह्यांना सोमवारी पावसाचा 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. येलो अलर्टचा अर्थ नागरिकांनी सतर्क राहावे असा असून, या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. पुढील तीन ते चार दिवस राज्यात अशीच समाधानकारक पावसाळी स्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.