‘…तर माझ्या मुलाला फाशी द्या’, मनोरंजनाच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
लोकसभेत घुसून गोंधळ घालणाऱ्या मनोरंजनला ताब्यात घेतल्यानंतर आता चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ती चौकशी समिती आता मनोरंजनाच्या घरीही पोहचली आहे, त्यावेळी त्याच्या वडिलांनी थेट माझ्या मुलाने काही चुकीचं केलं असेल तर त्याला फाशी द्या असच स्पष्टपणे सांगितले.

Parliament Winter Session 2023: देशाच्या संसदेत दोन तरुणाने घुसून गोंधळ घातल्यानंतर देशाच्या राजकारणात प्रचंड गदारोळ उठला. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजीही केली. ज्यावेळी दोन तरुण लोकसभेत (parliament) घुसल्यानंतर उपस्थित असलेल्या खासदारांनी (MP) त्यांना घेराव घातला आणि मारहाणही केली. त्यानंतर त्या दोघांनाही सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. तर त्याच वेळी सभागृहाबाहेरही घोषणाबाजी करणाऱ्या दोन आंदोलकांनाही ताब्यात घेण्यात आले. तर या प्रकरणाशी आणखी कोणाचा काही संबंध आहे का त्याचा शोध चालू करण्यात आला आहे.
माझा मुलगा सत्यवादी
लोकसभेच्या सभागृहात घुसखोरी केलेल्या दोन आरोपींपैकी एकाच्या वडिलांनी आपल्या मुलाविषयी प्रचंड विश्वास दाखवला आहे. त्यांचा मुलगा कोणतंही वाईट काम करणार नाही. तो सच्चा आणि इमानदार असाच आहे. संसदेतील गोंधळाप्रकरणी ताब्यात घातलेल्या मनोरंजनच्या वडिलांनी थेट दावा करत माझ्या मुलगा सत्याची कास धरणारा आहे असंही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा >> Amol Shinde: ‘पोलिसांना एवढंच म्हणालो, पोरगं मेलंय का तेवढं सांगा…’, अमोलच्या वडिलांची प्रतिक्रिया
संसदेचा अनादर मान्य नाही
मनोरंजनचे वडील देवराजे गौडा यांनी आपल्या मुलावर विश्वास दाखवत म्हणाले की, माझ्या मुलाने काही चुकीचं केलं असेल तर त्याला फाशी द्या. जर त्याने संसदेचा अपमान केला असेल तर तो माझा मुलगा नाही. कारण संसद ही सगळ्या भारतीयांची आहे. कारण ती अनेक महान लोकांनी मिळून ती संसद बनवली आहे. महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंसारख्या माणसांनी बलिदान देऊन तिची स्थापना केली आहे. त्यामुळे संसदेविषयी कोणीही अनादर केला तर ते कोणालाच मान्य होणार नाही. मग तो माझा मुलगा असला तरी ते मला मान्य नाही.
विवेकानंदाना मानतो आदर्श
मनोरंजनाच्या वडिलांनी सांगितले की, माझा मुलगा चांगलाच आहे आणि तो प्रामाणिकही आहे. समाजासाठी चांगलं काम करणारा, त्यासाठी काहीही त्याग करणारा असा माझा मुलगा आहे. आपल्या समाजासाठी सतत काही तरी चांगलं करत राहणं हे त्याचं स्वप्न होतं. त्याचा आवडता छंद पुस्तकं वाचणे आहे आणि त्याचे आदर्श स्वामी विवेकानंद आहेत.त्यांची पुस्तकं वाचूनच त्यांच्या मनात हे विचार निर्माण झाले असतील असंही त्यांनी सांगितले. त्यांनी हेही सांगितले की, माझ्या मुलाने 2016 मध्ये बीई (इंजिनीअरिंगमध्ये पदवी) पूर्ण केली आहे, मात्र त्याचवेळी तो शेतातही काम करत होता. बीई झाल्यावर त्याने दिल्ली आणि बेंगळुरूमधील काही कंपन्यांमध्येही काम केले होते.
कोणत्याही संघटनेशी संबंध नाहीत
दिल्ली पोलिसांनी लोकसभेतील गोंधळाप्रकरणी 4 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना आता अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दहशतवादविरोधी पथक आणि गुप्तचर यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. संसदेबाहेरून पकडण्यात आलेल्या नीलम आणि अमोल यांच्याकडे मोबाईल फोन नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून कोणतेही ओळखपत्र किंवा बॅगही नव्हती. त्या दोघांनीही कोणत्याही संघटनेशी आपला संबंध नाही असंही सांगितले. त्यांनी स्वतःच ठरवून संसदेविरोधात आवाज उठवल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकरणात एकूण 5 जणांचा सहभाग असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चार जणांना ताब्यात घेतले असले तरी आणखी दोघं फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.