Manoj Jarange : ही शेवटची संधी, नाहीतर पश्चाताप...; जरांगेंचा शिंदे सरकारला निर्वाणीचा इशारा
Manoj Jarange Patil Latest News : मनोज जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षण घेण्यावर ठाम.
ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil : राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवले आहे. या अधिवेशनाला सुरूवात होण्याआधीच मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सगेसोयरे शब्दाचा उल्लेख करत ही तुम्हाला शेवटची संधी आहे, नाहीतर पश्चाताप करावा लागेल, असा इशारा जरांगेंनी शिंदे सरकारला दिला आहे.
अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी अधिवेशनाआधी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, "या विशेष अधिवेशनात सरकारने सगेसोयरेची जी अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी सुरूवातीलाच करावी. नंतर मागासवर्ग आयोगाने जो अहवाल दिला आहे, त्याचा कायदा करण्यासाठी तो विषय दुसऱ्या सत्रात चर्चेला घ्यावा. कारण हे आंदोलन मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून उभं केलेलं आहे."
मराठा आमदारांना आवाहन
"ज्या नोंदी सापडल्या त्या आधारावर ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत, त्यांना आरक्षण देण्यासाठी सगेसोयरेची अधिसूचना काढलेली आहे. त्यासाठी सरकारने विशेष अधिवेशनात आधी सगेसोयरेची अंमलबजावणी करावी. महाराष्ट्रातील सर्व मराठा आमदार आणि मंत्र्यांनी हा विषय लावून धरावा", असे आवाहन जरांगे यांनी आमदारांना केली आहे.
"मराठ्यांची मागणी वेगळी करताय दुसरं, जर असं केलं तर तुम्ही मराठ्यांचे विरोधी आहात हे गृहित धरलं जाईल. तुम्ही अधिवेशन बोलवलंय. करोडो मराठ्यांची मागणी आहे की, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या", असे खडेबोल जरांगेंनी शिंदे सरकारला सुनावले.