मुंबईची खबर : हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी 22 कोटींचा प्रकल्प, काय आहे BMC चा प्लॅन?
मुंबईतील हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी पाच नवीन स्टेशन्स उभारण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे. यासाठी 22 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पाच नवीन हवेची गुणवत्ता तपासणारी केंद्रं
BMC चा महत्त्वाचा निर्णय
Mumbai News : मुंबईत खालावत चाललेल्या हवेच्या गुणेवतेबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरात आणखी पाच नवीन हवेची गुणवत्ता मोजणारी केंद्र (Air Quality Monitoring Stations) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 22 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या या नव्या प्रकल्पांतर्गत मुलुंड, दादर, गोरेगाव, चर्नी रोड आणि सांताक्रूझ या प्रमुख परिसरांमध्ये ही केंद्रं सुरु उभारली जाणार आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) मध्यम ते अतिवाईट श्रेणीत नोंदवला गेल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
'या' भागांना मोठा फायदा
या 22 कोटी रुपयांच्या प्रकल्पाधिष्ठित करारामध्ये या सर्व केंद्रांची स्थापना, त्यांचे यशस्वी संचालन आणि पुढील पाच वर्षे त्यांच्या देखभालीचा खर्च समाविष्ट आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाचपैकी दोन नवीन केंद्रं पालिकेच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या जुन्या सुविधांची जागा घेतील, तर उर्वरित तीन केंद्रं अशा ठिकाणी उभारली जातील जिथे 5 किलोमीटरच्या परिघात सध्या कोणतेही हवा मोजणी केंद्र उपलब्ध नाही. विशेषतः दादर, चर्नी रोड आणि मुलुंड येथे सध्या एकही केंद्र नसल्याने या भागांना मोठा फायदा होणार आहे.
हे ही वाचा : दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबद्दल सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, तातडीने पत्रकार परिषद घेत काय म्हणाल्या?
सहा महिन्यांच्या आत सुरु होणार प्रकल्प
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करूनच ही योग्य ठिकाणे निवडण्यात आली आहेत. सभोवतालच्या परिसरातील हवेची सामान्य गुणवत्ता अचूकपणे तपासण्यासाठी ही शहरी पार्श्वभूमी निरीक्षण केंद्रं (Urban background monitoring stations) म्हणून काम करतील. या प्रत्येक स्वयंचलित केंद्रासाठी 300 ते 700 चौरस फूट जमिनीची आवश्यकता असून, हे प्रकल्प पुढील सहा महिन्यांच्या आत पूर्ण होऊन पूर्णपणे कार्यरत होणे अपेक्षित आहे.
हे ही वाचा : गावातील 22 वर्षीय तरुणाच्या प्रेमात वेडी झाली महिला, नवऱ्याचा केला भयंकर शेवट
हवेच्या गुणवत्तेची अचूक माहिती
सध्या मुंबईत महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था (IITM) यांच्यामार्फत एकूण 29 हवा मोजणी केंद्रं चालवली जात आहेत. या सर्व केंद्रांवर गोळा होणारा डेटा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 'समीर' (Sameer) या राष्ट्रीय डॅशबोर्डवर पाठवला जातो. नवीन पाच केंद्र सुरू झाल्यानंतर मुंबईचे हवा गुणवत्ता निरीक्षण जाळे आणखी मजबूत होईल आणि नागरिकांना हवेच्या गुणवत्तेची अचूक माहिती मिळण्यास मदत होईल.
