'वडिलांचे अंत्यसंस्कार झाले , तिथेच आमचे..'; नागपुरात माय-लेकीचं टोकाचं पाऊल, पोलिसांना वेगळाच संशय

योगेश पांडे

Nagpur Crime : नागपूरमध्ये संपत्तीच्या वादाला कंटाळून माय-लेकीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुसाईड नोटमध्ये जावयावर गंभीर आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

Nagpur Crime News
Nagpur Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

'वडिलांचे अंत्यसंस्कार झाले , तिथेच आमचे..';

point

नागपुरात माय-लेकीचं टोकाचं पाऊल, पोलिसांना वेगळाच संशय

Nagpur Crime :  नागपूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून येथील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सधन कुटुंबातील माय-लेकीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. मृत महिलांची ओळख संगीता ढबाले (आई) आणि आकांक्षा ब्रम्हे (मुलगी) अशी पटली असून त्या दोघीही घरात एकत्र राहत होत्या. रात्रीच्या सुमारास या दोघींनीही आपल्या राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये त्यांनी आपला अंत्यसंस्कार गावाकडे त्याच ठिकाणी करावेत जिथे आकांक्षाच्या वडिलांचा अंत्यसंस्कार झाले होते, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, त्यांचे मृतदेह सासरच्या मंडळींना देऊ नयेत, असेही त्यांनी सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.

संपत्तीच्या वादातून माय-लेकीचे टोकाचे पाऊल?

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आकांक्षा ब्रम्हेचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता आणि काही महिन्यांपूर्वीच तिला मुलगी झाली होती. मात्र, दुर्दैवाने त्या नवजात मुलीचा मृत्यू झाल्याने आकांक्षा आपल्या आईच्या घरी राहायला आली होती. या काळात आकांक्षाचा पती लोकेश ब्रम्हे हा शेती, घर आणि इतर मालमत्तेसाठी आपली पत्नी आणि सासू यांच्याशी सातत्याने वाद घालत होता. आकांक्षा बँकेत नोकरी करत होती आणि तिची आई देखील नोकरीला होती, तर आकांक्षाच्या वडिलांचे 10 वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. 30 एप्रिलच्या रात्री लोकेश त्यांच्या घरी आला होता आणि मालमत्तेच्या कारणावरून त्यांच्यात मोठा वाद झाला, ज्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन माय-लेकीने दुकानातून दोरी आणली आणि मृत्यूला कवटाळले.

 सुसाईड नोटमधील धक्कादायक खुलासा; जावई लोकेशवर संशय

या आत्महत्येप्रकरणी नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत. नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात आणि सुसाईड नोटमधील मजकुरावरून पोलिसांना जावई लोकेश ब्रम्हे याच्यावरच आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा संशय आहे.  पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून त्यातील हस्ताक्षराची पडताळणी केली जात आहे.

नागपुरात खळबळ; सासरच्या मंडळींना मृतदेह देण्यास नकार

हे वाचलं का?