सात हजारांच्या कर्जासाठी फायनान्स कंपनीत शेतकऱ्याची हत्या? काय घडलं?
Nanded farmer death finance company loan recovery : नांदेडमध्ये खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. कर्जवसुलीसाठी शेतकऱ्याला ओलीस ठेवून मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सात हजारांच्या कर्जासाठी फायनान्स कंपनीत शेतकऱ्याची हत्या? काय घडलं?
खासगी फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर
Nanded farmer death finance company loan recovery : नांदेडमध्ये एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. कर्जवसुलीसाठी त्यांना ओलीस ठेवून शारीरिक छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी चंद्रकांत शिंदे यांना बेदम मारहाण केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना फाशी देण्यात आल्याचाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर शिंदे कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
चंद्रकांत शिंदे यांनी संबंधित फायनान्स कंपनीकडून सात हजार रुपये कर्ज घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. मात्र, या कर्जाच्या बदल्यात कंपनीकडून 70 हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कर्जाच्या पैशांसाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार फोन करून तगादा लावला जात असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
हेही वाचा : भीमाशंकर वृक्षतोडीवर देवेंद्र फडणवीस रोखठोक, टोरंट प्रकल्पाचं समर्थन करत काय म्हणाले?
मृतदेह आढळल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत शिंदे यांना दोन दिवसांपूर्वी बाजारातून फायनान्स कंपनीच्या कार्यालयात नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. याआधी त्यांच्या गावातील दोन व्यक्तींना अशाच प्रकारे नेण्यात आले होते आणि नंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. त्यामुळे चंद्रकांत शिंदे यांनाही परत सोडले जाईल, अशी कुटुंबीयांना अपेक्षा होती. मात्र, त्यांचा मृतदेह आढळल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. कर्जाच्या पैशांसाठी फोन करुन धमकावले जात असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. पैसे भरावेच लागतील, अन्यथा मारहाण केली जाईल, अशा स्वरूपाचे बोलणे झाल्याचे एका महिलेने सांगितले. चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा आधार हरपल्याची भावना त्यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली. या प्रकरणात न्याय मिळावा आणि शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नावाखाली त्रास देणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करा, कुटुंबियांची मागणी
या घटनेनंतर शिंदे कुटुंबीयांनी पोलिसांकडे दोषींविरुद्ध कठोर कारवाई व्हावी. संबंधित फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे. शेतकऱ्यांना अशा प्रकारे त्रास दिला जात असल्यास भविष्यात इतर शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसू शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. कर्जवसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांना मारहाण केली जात असल्याच्या आरोपांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला असून कुटुंबीयांनी पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे. चंद्रकांत शिंदे यांना नेमके कशा परिस्थितीत फायनान्स कंपनीच्या कार्यालयात नेण्यात आले आणि त्यानंतर काय घडले, याची सविस्तर माहिती तपासातून समोर येणे अपेक्षित आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची तपासणी करण्यासाठी न्यायवैद्यक पथकालाही बोलावण्यात आले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होईल, असे पोलिसांनी सांगितले. मृताच्या नातेवाइकांची तक्रार नोंदवून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाची माहिती काही तासांपूर्वीच मिळाली असून तपासात जे निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे चंद्रकांत शिंदे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यांना मारहाण करण्यात आली होती का आणि या घटनेत फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांची भूमिका काय होती, या प्रश्नांची उत्तरे तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत. सध्या या प्रकरणात कुटुंबीयांनी केलेले आरोप आणि पोलिसांचा तपास याकडे लक्ष लागले आहे.
